|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नववी ते अकरावीपर्यंत नापास करावे की नको

नववी ते अकरावीपर्यंत नापास करावे की नको 

गोवा शालान्त मंडळाच्या आजच्या सभेत निर्णय

प्रतिनिधी/ पणजी

नववी, दहावी व अकरावीतील विद्यार्थ्यांनाही नापास न करण्याच्या धोरणाची कार्यवाही करावी की करू नये, याचा निर्णय घेण्यासाठी आज मंगळवार 17 सप्टेंबर रोजी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. या धोरणास विरोध होण्याची चिन्हे आहेत. ते धोरण नववी ते अकरावीपर्यंत राबवू नये असा निर्णय आजच्या सभेत होण्याचे संकेत मिळत आहेत. मंडळाच्या कार्यकारी समितीने हा प्रस्ताव मान्य केला असला तरी तो या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण राबविण्यात येते व त्यानुसार सर्व मुलांना आठवीपर्यंत पास करण्यात येते. परंतु नंतर अनेक मुले नववी, दहावीत, टिकत नाहीत आणि नापास होतात म्हणून तेच धोरण नववी ते अकरावीपर्यंत वाढवावे असा मंडळाचा प्रस्ताव आहे. तो
प्रस्ताव मंडळाच्या कार्यकारी समितीने जारी केला असली तरी त्यास अनेक शिक्षक, प्राचार्य यांनी विरोध दर्शविला आहे.

मंडळाची आज सर्वसाधारण सभा

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (गोवा बोर्ड) ही सर्वसाधारण सभा आज सकाळी 10 वा. सुरु होणार असून ती सायं. 4 वा.पर्यंत चालणार आहे. पर्वरी येथील शिक्षण संचालनालयाच्या परिषद गृहात ती सभा होणार असून त्यात या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. शेवटी अंतिम निर्णय होणार असून मंडळाच्या कार्यकारी समितीच्या निर्णय सभेत उचलून धरणार की तो फेटाळणार यावरच त्या प्रस्तावाचे भवितव्य अवलंबून आहे.

शिक्षणाचा दर्जा लयास जाईल

या धोरणामुळे शिक्षणाचा दर्जा घसरला असून तो आणखी लयास जाईल असे मत प्राचार्य, शिक्षकांनी मांडले आहे. तो विरोध विचारात न घेता मंडळाच्या कार्यकारी समितीने त्या प्रस्तावास फारसे आढेओढे न घेता मान्यता दिली. तो निर्णय आता मंडळाच्या सर्वसाधारण सभेसमोर येणार असून कार्यकारी समितीचा निर्णय मान्य करायचा की फेटाळायचा हे आता सभेत ठरणार आहे.

नापास विषय पुढच्या इयत्तेत सोडवावा

नववी, दहावी व अकरावीसाठी नापास होणाऱया विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी पुरवणी परीक्षा ठेवावी तसेच ज्या विषयात नापास झाला तो विषय नंतर पुढील इयत्तेत सोडवावा, असे त्या प्रस्तावाचे स्वरूप आहे. त्या प्रस्तावास प्राचार्य, शिक्षकांकडून विरोध होणरा असून तो फेटाळला जाणार आहे.

शिक्षण कायदय़ानुसार विस्ताराची योजना

शिक्षण अधिकार कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणालाही नापास करता येत नाही अशी तरतूद आहे. त्यानुसार सध्या आठवीपर्यंत सर्व मुलांना पास करण्यात येते परंतु ती मुले नववी – दहावीत फारशी टिकत नाहीत, असे समोर आल्यामुळे अनेक शाळेच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी त्या धोरणास विरोधच दर्शवला होता. तरी देखील ते धोरण गोव्यातील शाळातून राबविण्यात आले आणि सध्या तेच चालू आहे. तेच धोरण नववी, दहावी, अकरावीत विस्तारित करण्याचा शालांत मंडळाचा इरादा आहे. एकंदरित परिस्थिती पाहता तो इरादा सफल होणार नाही, असे दिसून येत आहे. 

वर्ष वाया न जाण्यासाठी प्रस्ताव

अनेक मुले नापास झाल्यानंतर शाळा सोडतात. त्यामुळे मुलांची शाळेतून गळती होते. तसेच त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. ते टाळण्यासाठी तसेच त्यांची वर्षे वाया जावू नयेत म्हणूनच मंडळाने नापास न करण्याचे धोरण नववी ते अकरावीपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे. नापास होणाऱयांना पुरवणी परीक्षा ठेवावी. त्या परीक्षेतही नापास झाल्यास ते विषय दहावीत, अकरावीत किंवा बारावीत सोडवावे. तोपर्यंत सर्व मुलांना पुढील वर्षासाठी प्रवेश देण्यात यावा, असे एकंदरित या धोरणाचे स्वरुप आहे. परंतु हे शाळेच्या मुख्याध्यापकांना, उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांना मान्य नाही.

Related posts: