|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आमदारांच्या दणक्याने मत्स्य विभागाला जाग

आमदारांच्या दणक्याने मत्स्य विभागाला जाग 

जीवाची पर्वा न करता आमदार नाईक उतरले खवळलेल्या समुदात

पोलीस प्रशासनाच्या साथीने तीन ट्रॉलर ताब्यात

तिन्ही ट्रॉलरवर 1 लाख 79 हजारांची मासळी

प्रतिनिधी / मालवण:

येथील समुद्रात घुसून मासळीची लूट करणाऱया परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरवर कारवाईसाठी समुद्रात उतरलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यासह मत्स्य विभाग, पोलीस कर्मचाऱयांच्या पथकाने गुजरातमधील तीन ट्रॉलर पकडण्यात यश मिळविले. हे तिन्ही ट्रॉलर सोमवारी रात्री येथील बंदरात आणण्यात आले. या तिन्ही ट्रॉलरवरील मासळीचा लिलाव करण्यात आला. यात तिन्ही ट्रॉलरवरील मासळीचा सुमारे 1 लाख 79 हजार 680 रुपयांचा लिलाव करण्यात आला. संबंधितांवर कडक कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिली.

दरम्यान, गेले काही दिवस सातत्याने जिल्हय़ाच्या सागरी जलधी क्षेत्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी हैदोस घातला असून मासळीची लूट सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. यापुढेही ही कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांना देण्यात आले आहेत. यापुढेही घुसखोरी सुरू राहिल्यास त्या बोटी सील करण्याची कार्यवाहीही केली जाईल, असा इशारा आमदार नाईक यांनी आज येथे दिला.

जीव धोक्यात घालून आमदारांची लढाई

परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून जिल्हय़ाच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासळीची लूट करण्याबरोबरच स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्य़ांची तोड केली जात होती. त्यामुळे आक्रमक बनलेले आमदार नाईक हे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त, परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, पोलीस कर्मचाऱयांसह गस्तीनौकेद्वारे रात्री समुद्रात कारवाईसाठी रवाना झाले. समुद्र खवळलेला तसेच वाऱयाचा जोरही कायम असून गस्तीनौकेद्वारे हायस्पीड ट्रॉलर्स पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या धडक कारवाईत गुजरात येथील तीन ट्रॉलर्स ताब्यात घेण्यात यश आले. यात आमदारांनाही भर समुद्रात नौका थांबून राहिल्यामुळे त्रास जाणवला होता. तर फोटोग्राफरही यातून सुटले नाहीत.

तिन्ही ट्रॉलरवर मासळी

रात्री उशिरा हे तिन्ही ट्रॉलर्स येथील बंदरात आणण्यात आले. या ट्रॉलर्सवरील खलाशी तसेच महत्वाची कागदपत्रे मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतली. या तिन्ही ट्रॉलर्सवरील मासळीचा आज सकाळी मासळी मंडईनजीक लिलाव करण्यात आला. यात ‘मा भगवती वादवा कृपा’ आयएनडी-जीजे-11 एमएम-3052 या ट्रॉलरवर 49 हजार 200 रुपयांची मासळी आढळली. ‘नारायणी-12’ आयएनडी-जीजे-एमएम-12465 या ट्रॉलरवर 72 हजार 840 रुपयांची मासळी आढळली. ‘राम बलराम’ आयएनडी-जीजे-11-एमएम-12783 या ट्रॉलरवर 57 हजार 640 रुपयांची मासळी आढळली. या तिन्ही ट्रॉलर्सच्या मालकांविरोधात तहसीलदारांकडे कारवाईसाठी प्रतिवेदन सादर केले जाणार असल्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त वस्त यांनी स्पष्ट केले. परराज्यातील ट्रॉलर्सच्या घुसखोरीविरोधात स्थानिक मच्छीमारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यापुढेही गस्तीनौकेद्वारे कडक कारवाई सुरूच ठेवली जाणार आहे. यासाठी पोलिसांनीही सहकार्य करावे, असे आवाहन वस्त यांनी केले.

यापुढेही धडक कारवाई – आमदार

परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी होत असताना कारवाईसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी मत्स्यव्यवसाय विभागाकडे उपलब्ध नव्हते. मात्र, मत्स्य व्यवसाय विभागातील तीन रिक्तपदे भरण्यात आली असून उर्वरित एक पदही  दोन-चार दिवसात भरण्यात येईल. परराज्यातील ट्रॉलर्सच्या घुसखोरीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागातर्फे यापुढेही धडक कारवाई मोहीम सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरही परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू राहिल्यास त्यांच्यावर कडक कारवाईबरोबरच ते ट्रॉलर्स कायमस्वरुपी सील कसे करता येतील, यादृष्टीनेही प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले.

Related posts: