|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दारुची नशा, रागाचा पाऱयात अखेर आजीने गमवला जीव

दारुची नशा, रागाचा पाऱयात अखेर आजीने गमवला जीव 

प्रतिनिधी/ सातारा

राजापुरीतील एका नातवाने दि. 11 रोजी आजीने स्वयंपाक चांगला केला नसल्याच्या किरकोळ कारणातून आजीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. गेले सात दिवस ही 78 वर्षीय आजी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती; पण अखेर बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.   दारुच्या नशेत नातवाला आलेला राग अशा प्रकारे आजीच्या जीवावरच बेतल्याची मन हेलावून टाकणारी दुर्दैवी व माणुसकीला काळिमा फासणारी घटना राजापुरीकरांच्या जीवाला लागून गेली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजापुरी, ता. सातारा येथे दि. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या वेळी शरद बजरंग साळुंखे (वय 36) हा दारु पिवून घरी आला. त्यावेळी त्याची आजी गीताबाई मारुती साळुंखे (वय 78) यांनी जेवण तयार करुन ठेवले होते. दारुच्या नशेत आलेल्या नातवाला आजीने मायेने जेवण देखील वाढले. मात्र, शरद नावाच्या दिव्य नातूला जेवणच आवडले नाही. शरदने जेवण चांगले झाले नाही म्हणून आजीला शिवीगाळ सुरु केली.

आजीला हे नेहमीचेच होते त्यामुळे तिने दुर्लक्ष करत गप्प राहणे पसंत केले होते. मात्र, दारुची नशेत आलेल्या रागाने घात केला. रागाचा पारा चढलेल्या शरदने आजीच्या अंगावर रॉकेल ओतले. त्यावेळी नातवाचा हा रुद्रावतार आणि त्याची देहबोली पाहून आजी गीताबाई यांनी आरडाओरडा सुरु केला. शरदचा हा प्रकार नेहमीचा असल्याने शेजाऱयांनी फारसे लक्ष दिले नसावे तेवढय़ात शरदने चुलीवरील काडीपेटी घेतली आणि ज्या आजीच्या हातचे दोन घास खावून जगत होता तिलाच पेटवून दिले. जीवाच्या आकांताने गीताबाई ओरडू लागल्या. त्यांच्या साडीने तोपर्यंत चांगलाच पेट घेतला होता.

 या घटनेमध्ये त्या गंभीर भाजल्या होत्या. शेजारी पाजाऱयांनी तातडीने त्यांना परळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 108 नंबरच्या रुग्णवाहिकेने तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गेली 7 दिवस त्यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज बुधवारी दुपारी 2.40 वाजता संपली आणि दारुबाज नातवाच्या क्षणिक रागाच्या त्या बळी ठरल्याची विदारक घटना राजापुरीच्या ग्रामस्थांच्या नशिबी आली. दरम्यान, या नातवावर सातारा तालुका पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यावर आता आजीच्या खुनाचा दाखल होईल.

Related posts: