पालकांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळल्या पोषण आहारात आळय़ा

प्रतिनिधी/ सातारा
शहराच्या पश्चिम भागातल्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेची मोठी शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार हा बाहेरुन शिजवून आणण्याची प्रथा आहे. शाळेतल्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांनी पालकांकडे तक्रारी केल्यानंतर पालकांनीच दि. 28 रोजी स्टींग ऑपरेशन केले होते. त्यात अळय़ा आढळून आल्याने पोषण आहार शिजवून देणाऱया ठेकेदार महिलेचे पितळ शाळेच्या मुख्याध्यापकांसमवेत उघडे पाडले. मुख्याध्यापकांकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने पालकांनी गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी त्या शाळेत पथक गेले. पथकाच्या तपासणीवरही संशय पालकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता त्यावर भाष्य करण्यास टाळले. मात्र, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ हे काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा शहरात अनेक शाळा आहेत. राज्य शासनाने या शाळेतील मुलांना पोषण आहार देण्यासाठी सोय केलेली आहे. काही शाळांनी शाळेच्या आवारातच पोषण आहार शिजवून देण्याची प्रथा सुरु केली आहे, तर काही शाळा या बाहेरुन आहार शिजवून घेतात. पश्चिम भागातील नावाजलेल्या एका शिक्षण संस्थेचीही मोठी शाळा आहे. या शाळेने पोषण आहार शिजवण्याचा ठेका एका पेठेतल्या कर्त्या महिलेला दिला आहे. त्या महिलेकडूनही पोषण आहाराचा सुरुवातीला दर्जा ठेवला होता, परंतु नंतर नंतर दर्जा बिघडू लागला. दुपारच्या वेळेत पोषण आहार शिजवलेले डबे रिक्षातून शाळेत पोहचतात. आहाराचा दर्जा बरोबर नसल्याने विद्यार्थी आहार न खाता तो डब्यातून घरी नेतात. घरी नेल्यानंतर पालकांनाही आहार का खात नाहीत याचे पडलेले कोडे उलघडले. 28 ऑगस्ट 2019 रोजी सुज्ञ पालकांनी स्टींग ऑपरेशन केले. मुख्याध्यापकांसमोरच आहाराचे डबे उघडताच एका डब्यातून आळय़ा आढळून आल्या. त्यावर मुख्याध्यापकांनीही अबोल धरल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यावर मुख्याध्यापकांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्याकडे ही तक्रार केली. त्यांच्या पथकाने मंगळवारी शाळेतल्या आहाराची तपासणी केली. मात्र, आता कारवाई करता त्यांच्यावरही दबाव येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आता गटशिक्षणाधिकारी धुमाळ हे तक्रारींनुसार पालकांनी दिलेल्या पुराव्यानुसार शाळेवर कारवाई करणार अशी चर्चा पालकवर्गातून होवू लागली आहे. याबाबत ‘तरुण भारत’ने शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता त्यांनी मी या विषयावर बोलू इच्छित नाही. नियमानुसार सर्व काही होईल, असे त्यांनी सांगितले.।़