|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वॉर ट्रॉफी तरुणांना प्रेरणा देतील

वॉर ट्रॉफी तरुणांना प्रेरणा देतील 

लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू यांचा विश्वास, कराडला रणगाडा, विमानाचे लोकार्पण

प्रतिनिधी/ कराड

बांगला मुक्ती स्वातंत्र संग्रामात 1971 साली विमान व टी 55 रणगाडा या दोन्ही आयुधांचा प्रत्यक्ष वापर झाला होता. ही दोन्ही आयुधे लष्कराच्या वतीने कराडला वॉर ट्रॉफी म्हणून भेट देण्यात आली आहेत. कराडात गेली एकवीस वर्षे साजरा होणारा विजय दिवस समारोह आणि देशाचे संरक्षणमंत्री पद ज्यांनी सांभाळले, अशा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विजय दिवस समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी सैन्य दलाकडे पाठपुरावा करुन ही आयुधे मिळवली. ती परिसरातील तरुणांना लष्करात भरती होण्यासाठी प्रेरणा देतील, असे उद्गार लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू यांनी काढले.

  कराड नगरपरिषद व विजय दिवस समारोह समितीच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये बसवण्यात आलेल्या व बांगला मुक्ती स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष वापर झालेल्या ग्नटी 55 रणगाडा आणि लढाऊ विमानाचे लोकार्पण शुक्रवारी लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 या कार्यक्रमासाठी कर्नल जयराम, ब्रिगेडीअर कुलदीप सिंग, ब्रिगेडीअर गोविंद कलवाड, मेजर बास्को, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, अतुल शिंदे, सौरभ पाटील, फारुक पटवेकर, वैभव हिंगमिरे, बाळासाहेब यादव, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नागरिक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी नारीशक्ती व तिरंगा बाईक रॅली शहरातून काढण्यात आली. त्यानंतर देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. नगरपरिषदेच्या वतीने लेफ्टनंट पन्नू यांना मानपत्र देण्यात आले.

   ले. जनरल पन्नू म्हणाले, कराडसह सातारा जिल्हा ही वीरांची भूमी आहे. या भूमीतून लष्करात भरती होणाऱया तरूणांचे प्रमाण जास्त आहे. ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचीही कर्मभूमी आहे. आज परिस्थिती बदलली आहे. येथील युवा वर्ग भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करताना दिसतील. या परिसरातील युवक सैन्यात भरती होण्यासाठीही नेहमीच इच्छुक असतात. येथे ठेवण्यात आलेल्या आयुधांमुळे सैन्य दलाबाबत नेहमीच आपुलकीचे नाते निर्माण होऊन त्यांना प्रेरणा मिळेल.

नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी कर्नल संभाजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लष्करातील विमान व रणगाडे मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच त्याच्यामुळे कराडच्या वैभवात आणखी भर पडली असून पालिका कायमस्वरूपी त्याचे जतन करेल, अशी ग्वाही दिली.

   विजय दिवस समारोह समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी प्रास्ताविकात कराड शहराची ओळख उपस्थित पाहुण्यांना करून दिली. ते म्हणाले, कराड शहरातून अनेक थोर मंडळी घडली असून त्यांच्यामुळे कराडचे नाव उज्ज्वल झाले आहे. या भागातील तरूणांना लष्करात भरती होण्याची प्रेरणा मिळण्यासाठी या वॉर ट्रॉफी येथे बसवण्यात आल्या आहेत.

यावेळी कर्नल जयराम व मेजर बास्को यांनीही मनोगते व्यक्त केली. ऍड. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

 

Related posts: