|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सौदीत सैन्य तैनात करणार अमेरिका

सौदीत सैन्य तैनात करणार अमेरिका 

शस्त्रास्त्रही होणार तैनात : इराणवर थेट कारवाईचा निर्णय नाही

वॉशिंग्टन 

 अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियात सैन्य तैनात करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सौदी अरेबियाची तेल कंपनी अराम्कोच्या दोन तेलशुद्धीकरण प्रकल्पांवर मागील आठवडय़ात ड्रोन तसेच क्षेपणास्त्र हल्ले झाले होते. या हल्ल्यांची जबाबदारी येमेनमधील हुथी बंडखोरांनी स्वीकारली असली तरीही अमेरिका आणि सौदी अरेबियाने याकरता इराणला जबाबदार ठरविले होते.

अमेरिकेच्या नव्या घोषणेसह इराणवर सद्यकाळात कुठल्याही प्रकारच्या थेट कारवाईची शक्यता घटली आहे. पण अमेरिकेने शुक्रवारीच त्याच्यावर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादले आहेत.

सौदी अरेबियावरील पुढील कुठल्याही प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी ट्रम्प यांनी सैन्य आणि आवश्यक शस्त्रास्त्रांची तैनात करण्यास मंजुरी दिली आहे. या शस्त्रास्त्रांमध्ये क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा सामील असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क ऍस्पर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

सौदी अरेबियाने पुन्हा हल्ला होण्याची शक्यता पाहता अमेरिकेकडून मदत मागितली होती. अमेरिका स्वतःच्या सहकारी देशांचे पूर्णपणे समर्थन करतो. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन व्हावे याकरता हेच योग्य पाऊल असल्याचे ऍस्पर यांनी म्हटले आहे.

कारवाईचा निर्णय टाळला

सौदीतील तेल प्रकल्पांवर हल्ले झाल्यावर ट्रम्प प्रशासनाने इराणवर कारवाई करण्याची तयारी केली होती. अमेरिकेच्या अधिकाऱयांनी कारवाईची योजना ट्रम्प यांच्यासमोर मांडली होती. पण अमेरिकेच्या नव्या निर्णयाकडे इराणसोबतचे युद्ध रोखण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. काही महिन्यांपूर्वी इराणने अमेरिकेचा एक ड्रोन पाडविला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी इराणवर त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला होता. पण विदेश आणि संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी हा आदेश मागे घेतला होता.

Related posts: