|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » उत्तर प्रदेशात फटाका कारखान्यात स्फोट

उत्तर प्रदेशात फटाका कारखान्यात स्फोट 

सहा जणांचा जागीच मृत्यू : स्फोटाने कारखान्याची इमारत जमीनदोस्त

 वृत्तसंस्था / एटा

उत्तर प्रदेशातील एटा जिल्हय़ातील मिरहचीमध्ये शनिवारी फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने हाहाकार माजला. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. ज्या इमारतीमध्येही स्फोटाची दुर्घटना घडली ती इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली. तर परिसरातील अनेक इमारतींना या स्फोटामुळे तडे गेले आहेत. स्फोटाच्या हादऱयाने अनेकांचे मृतदेह घटनास्थळापासून 50 मीटर अंतरावर जाऊन पडले. तब्बल 15 मिनिटे या स्फोट होत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी जिल्हाधिकाऱयांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिरहची येथे राहणाऱया मुन्नी देवी यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये दिवाळीसाठी तयार करण्यात येणाऱया फटाक्यांचा दारूगोळा तयार करण्यात आला होता. याच इमारतीत शनिवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या हादऱयाने कारखान्याची इमारत जमीनदोस्त झाली. कारखान्यात ठेवलेल्या दारूगोळय़ामुळे आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. स्फोटानंतर कारखान्यातील आणि बाहेरील लोकांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह काही अंतरावर जाऊन पडले.

दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी

 घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने इमारतीचा ढिगारा घटनास्थळावरून बाजूला केला. या ढिगाऱयात अनेकांचे अवयव तुटून पडले होते. दरम्यान, या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.

Related posts: