|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 300 कोटींचे केटामाईन निकोबारमध्ये जप्त

300 कोटींचे केटामाईन निकोबारमध्ये जप्त 

तटरक्षक दलाची कारवाई : 6 जणांना अटक, जहाजही जप्त

वृत्तसंस्था/ चेन्नई

अंदमान निकोबार बेटांजवळ तटरक्षक दलाने शनिवारी कारवाई करत प्रतिबंधित केटामाईन नावाचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्याचे वजन तब्बल 1160 किलोग्रॅम असून अद्याप त्याची किंमत अंदाजे 300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तटरक्षक दलाने हे ड्रग्ज आणणारे जहाज आणि त्यावरील सहाजणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. हे जहाज म्यानमारचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतीय तटरक्षक दलाचे गस्ती जहाज राजवीरने ही कारवाई केल्याचे तटरक्षक दलाचे महानिरीक्षक मनिष पाठक यांनी सांगितले. भारतीय समुद्री हद्दीमध्ये आलेल्या म्यानमारच्या या जहाजाची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करून 1160 किलो ड्रग्ज ताब्यात घेतले आहेत. दक्षिणपूर्व आशियाई देशांमध्ये ते पाठवले जात असल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. डोर्नियर सर्व्हिलान्स विमानातून या जहाजावरील संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली. त्यानंतर तटरक्षक दलाने ही स्वतंत्रपणे मोहीम राबवून संबंधित जहाज ताब्यात घेतले.

या भागातून अंमली पदार्थांची वाहतूक केली जात असल्याने तटरक्षक दलाने येथील गस्त वाढवली आहे. जप्त करण्यात आलेले ड्रग्जची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आली असून अद्याप एनबीसीने त्याची किंमत ठरवली नसल्याचेही पाठक यांनी सांगितले.

Related posts: