|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो 

10 ते 12 जानेवारीदरम्यान उस्मानाबादमध्ये रंगणार 93 वे मराठी साहित्य संमेलन

पुणे /  प्रतिनिधी

उस्मानाबाद येथील नियोजित 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्ये÷ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत उस्मानाबाद येथे रविवारी पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही.

महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. घटक संस्थांनी वेगवेगळय़ा साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचविली होती. 

ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ समीक्षक भारत सासणे, प्रतिभा रानडे यांची नावे महामंडळाच्या घटक, संलग्न, समाविष्ट संस्थांनी ठेवली होती, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेने साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव सुचवले होते. या नावांवर चर्चा झाल्यानंतर दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली.

 दिब्रिटो यांची कारकीर्द

फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीपर लेखन केले आहे. ‘सुबोध बायबलानवा करार’ या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. 15 व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘आनंदाचे अंतरंग’, ‘तेजाची पाऊले’, ‘परिवर्तनासाठी धर्म’, ‘ओऍसिसच्या शोधात’, ‘सृजनाचा मळा’, ‘नाही मी एकला’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘गोतावळा’ हे त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. वसई येथे वास्तव्य असलेले फादर दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात धर्म आणि वैचारिक लेखनाद्वारे मौलिक भर घातली आहे.

  मस्तक लहान, मुकुट मोठा : फादर दिब्रिटो

संमेलनाध्यक्षपद मिळणे हा माझा खूप मोठा सन्मान समजतो. हे पद अनेक दिग्गज साहित्यिकांनी भूषविले आहे. साहित्याचा सेवक म्हणून मी प्रवेश करत आहे. माझी जबाबदारी वाढली आहे. माझे मस्तक लहान आहे, पण मुकुट मोठा आहे, अशी भावना फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी यावेळी व्यक्त केली.

साहित्य संमेलन 10 ते 12 जानेवारीदरम्यान

बैठकीमध्ये संमेलनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, 10 ते 12 जानेवारीदरम्यान उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन रंगणार आहे. विविध कार्यक्रमांचा आाराखडादेखील या बैठकीमध्ये तयार करण्यात आला आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले.

 मराठीसाठी ही आश्वासक घटना : डॉ. श्रीपाद जोशी

फादर दिब्रिटो यांची आगामी संमेलनाध्यक्षपदी एकमताने झालेली निवड ही मराठी साहित्य संस्थात्मक व्यवहार आणि एकूणच मराठीसाठी फार आश्वासक घटना आहे, अशी प्रतिक्रिया ज्ये÷ कवी आणि समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे. फादर दिब्रिटो यांच्यासह हा निर्णय घेणारे महामंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि या निर्णयात सहभागी सर्व घटक, समाविष्ट व संलग्न संस्थांचे या ऐतिहासिक स्वरूपाच्या निर्णयाबद्दल त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

Related posts: