|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » अमित पांघल, कौशिकचा गौरव

अमित पांघल, कौशिकचा गौरव 

क्रीडामंत्री रिजिजू यांच्याकडून                     रोख बक्षिसे प्रदान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी अमित पांघल व मनीष कौशिक या मुष्टियोद्धांचा रोख पुरस्कार देऊन गौरव केला. या दोघांनीही रशियातील एकतेरिनबर्ग येथे नुकत्याच झालेल्या पुरुषांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदके मिळविली आहेत.

अमित पांघलला 52 किलो वजन गटात रौप्य जिंकल्याबद्दल 14 लाख रुपये तर कौशिकला 63 किलो वजन गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल 8 लाख रुपयांचा  धनादेश रिजिजू यांनी प्रदान केला. पांघलला या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळाले होते. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करीत असा पराक्रम करणारा पहिला भारतीय मुष्टियोद्धा होण्याचा बहुमान मिळवित इतिहास रचला होता. हरियाणाच्या या 24 वर्षीय खेळाडूने 2018 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच 2019 मधील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले तर 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते.

23 वर्षीय मनीष कौशिकने या स्पर्धेत प्रभावी प्रदर्शन घडविताना चौथ्या मानांकित व आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यजेत्या बातारसुखिन चिनझोरिगला शेवटच्या सोळा फेरीत पराभवाचा धक्का दिला होता. मात्र उपांत्य फेरीत त्याला अग्रमानांकित अँडी प्रुज गोमेझकडून हार पत्करावी लागली होती. ‘पुरुषांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम प्रदर्शन केले याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या यशावरून बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात भारताला उज्ज्वल भवितव्य असल्याचे वाटते. फक्त पदकविजेत्यांचेच नव्हे तर उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलेल्या मुष्टियोद्धय़ांचे अभिनंदन करायला हवे. त्यांची कामगिरीही कौतुकास्पद होती,’ असे क्रीडामंत्री रिजिजू म्हणाले.

‘हे ऑलिम्पिकचे वर्ष असून टोकियोत होणाऱया स्पर्धेत भारतीय खेळाडू निश्चितच चमकदार कामगिरी करतील, हेच या पदकांवरून सिद्ध होते. त्यांची या स्पर्धेची चांगली तयारी केली असल्यचेच हे द्योतक आहे. ऑलिम्पिकसाठी तयारी करीत असलेल्या सर्व क्रीडा प्रकारांतील सर्वच खेळाडूंना आमचा पूर्ण पाठिंबा असेल, याची मी ग्वाही देतो,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.

Related posts: