|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोण रवींद्र भवनाचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार

काणकोण रवींद्र भवनाचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार 

प्रतिनिधी/ काणकोण

काणकोणच्या बांधकामाधीन रवींद्र भवनचे काम मार्च, 2020 पर्यंत पूर्ण करून साधारणपणे एप्रिल महिन्यात त्याचे उद्घाटन करण्याचे स्पष्ट आश्वासन कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकल्पाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिले.

काणकोणचे आमदार असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी सदर प्रकल्पाचे काम संथगतीने चालू असल्याची तक्रार केल्यानंतर आपण या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याबरोबर या ठिकाणी कसल्याच प्रकारच्या त्रुटी आढळणार नाहीत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रकल्पाचे काम चालू असतानाच काणकोणचे साहित्यिक, कलाकार, स्थानिक नगरसेवक त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. आवश्यक त्या सूचनांचा जरूर विचार केला जाईल, असे त्यांनी यावेळी स्प्ष्ट केले.

यावेळी उपसभापती फर्नांडिस, काणकोणच्या नगराध्यक्षा नीतू देसाई, पालिकेचे अन्य नगरसेवक, उपजिल्हाधिकारी विकास कांबळी, काणकोण भाजप मंडळ समितीचे अध्यक्ष महेश नाईक, कला आणि संस्कृती खात्याचे अधिकारी, भाजपाचे कार्यकर्ते, बांधकामाचे ठेकेदार, सल्लागार उपस्थित होते. आपण एक कलाकार या दृष्टीने रवींद्र भवनाकडे पाहतो. गोव्यातील अन्य सर्वच रवींद्र भवनांमध्ये ध्वनियोजनेच्या बाबतीत गांभीर्य दाखविण्यात आलेले नाही. त्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. त्या त्रुटी या भवनामध्ये असणार नाहीत, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

पारंपरिक तळीचे सौंदर्यीकरण करणार

800 आसनक्षमतेचे भव्य सभागृह, नगरवाचनालय, तालीम सभागृह, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र ग्रीन रूम, संगीत वर्गासाठी स्वतंत्र कक्ष, लिफ्टची सोय, सोयीस्कर अशी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी असेल. या रवींद्र भवनाच्या माध्यमातून काणकोण तालुक्यातून चांगले कलाकार घडावेत, त्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावे हा उद्देश आहे. गोव्यातील एक उत्तम असे हे भवन असेल. या भवनाच्या परिसरात असलेल्या पारंपरिक तळीचे गाळ उपसून सैंदर्यीकरण करतानाच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

कला अकादमी आणि कला व संस्कृती खात्याच्या अखत्यारित येणारी सर्व केंद्रे या ठिकाणी कशी सामावून घेता येईल याकडे लक्ष दिले जाईल, असे सांगून मंत्री गावडे यांनी उपसभापती फर्नांडिस व अन्य नागरिकांच्या उपस्थितीत सर्व प्रकल्पाची पाहणी केली आणि ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना केल्या. 2017 साली या प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती. त्यावळी त्याचा खर्च 57 कोटी इतका मंजूर करण्यात आला होता. एकूण 8000 चौ. मी. इतक्या जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात असून दोन महिन्यांनंतर परत एकदा या ठिकाणी आपण भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: