|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » काका, चुलत भावाकडून 50 लाखांची फसवणूक

काका, चुलत भावाकडून 50 लाखांची फसवणूक 

प्रतिनिधी /सोलापूर :

   आंध्रप्रदेशात असलेल्या सर्व राज्यातील रुग्णालयात औषध पुरविण्याची संधी एजन्सीच्या माध्यमातून मिळाली असून, त्यातून मिळणारा नफा मोठा आहे. तो रोख स्वरुपात दरमहिना देण्याचे आमिष दाखवून आंध्रदेशातील विजयवाडा येथील पिता-पुत्राने सोलापुरातील खासगी कंपनीत मॅनेंजर म्हणून काम पाहणारे प्रशांत आयप्पा कोत्ता (वय 34, रुची नगर, रेणुका प्लाझा, जुळे  सोलापूर) यांची 49 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत कोत्ता हे मुळचे आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील. त्यांच्या शेजारीच आरोपी चुलता व्यंकटा सत्यनारायण कोत्ता व चुलत भाऊ वीर व्यंकटा गिरीनाथ कोत्ता हे राहण्यास होते. सन 2010 पूर्वी आरोपींनी प्रशांत यांना औषध एजन्सी भागीदारीतून करण्याबाबत  चर्चा केली होती. परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी आरोपींना नकार दिला होता. सन 2010 मध्ये प्रशांत यांना सोलापुरातील एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्याने ते सोलापुरात स्थायिक झाले. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2015 रोजी आरोपींनी प्रशांत यांना महत्वाचे काम आहे, सोलापूर रेल्वे स्टेशनवर बोलावून घेऊन, आंध्रप्रदेशातील सर्व रुग्णालयात औषध पुरविण्याची संधी आहे, अशी संधी पुन्हा मिळणार नाही, भागीदारीत व्यवसाय करु, म्हणून विश्वासात घेतले. त्याचबरोबर व्यवसायातून वार्षिक सुमारे 10 लाखांचा फायदा होईल आणि तो रोख स्वरुपात देण्याचेही आमीष आरोपींनी प्रशांत यांना दाखविले होते.

त्यानंतर प्रशांत यांनी मित्र दिव्यारंजन यांच्या नावे कर्ज प्रकरण करुन, तसेच सासरे राम मोहनराव यांच्याकडून घेतलेले 12 लाख, नातेवाईक जी. साईचंद्रशेखर राव यांच्याकडून घेतलेले 8 लाख 50 हजार रुपये उसने घेतले. त्यानंतर प्रशांत यांनी 29 लाख 26 हजार 200 रुपये बँकेच्या माध्यमातून तर रोख स्वरुपात 20 लाख 50 हजार रुपये असे एकूण 49 लाख 76 हजार 200 रुपये चंद्रा फार्मसी नावाच्या भागीदारी व्यवसायामध्ये गुंतविले होते. यानंतर प्रशांत यांनी आरोपींकडे व्यवसायाबाबत चौकशी केली असता, त्यांनी व्यवसाय सुरु असल्याबाबत सांगितले. व्यवसायातून मिळणाऱया नफ्याबाबतची चर्चा केल्यानंतर आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत होते. यामुळे संशय आल्याने प्रशांत यांनी विजयवाडा येथे चौकशी केली. त्यावेळी आरोपी कोणताही व्यवसाय करीत नसल्याची माहिती समोर आली.

Related posts: