|Sunday, January 26, 2020
You are here: Home » मनोरंजन » अंकुश, शिवानीची केमिस्ट्री दाखविणारे गाणे प्रदर्शित

अंकुश, शिवानीची केमिस्ट्री दाखविणारे गाणे प्रदर्शित 

‘ट्रीपल सीट’ 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

ऑनलाईन टीम / पुणे :

 महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी आणि बिगबॉस फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्यातील केमिस्ट्री दाखवणारे ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटातील ‘नाते हे कोणते’ गाणे नुकतेच सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत पावसे यांनी केले आहे.

अविनाश विश्वजित यांनी संगीतबद्ध केलेले ‘नाते हे कोणते’ हे गाणे हरगुन कौर आणि रोहित राऊत यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. गाण्याच्या बोलांप्रमाणेच ‘नाते हे कोणते, कोणास ना, कळले कधी’ अशी या दोघांच्याही मनाची अवस्था या गाण्यात झालेली दिसते. या गाण्यात अंकुश आणि शिवानी दोघेही भान विसरून एकमेकांशी फोनवर गप्पा मारताना दिसत आहेत.

‘नाते हे कोणते’ या गाण्यात अंकुश आपल्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत असतानाही केवळ शिवानीसोबत फोनवर बोलण्यात गुंग दिसतो, तसेच शिवानी सुद्धा आपल्या घरी, कॉलेज मध्ये असतानाही सतत फोनवर बोलताना दिसते. बऱयाचदा अंकुशच्या या फोनवर बोलण्यामुळे त्याच्या मित्रांची धमाल उडते व शिवानीला चक्क पेपर सोडवताना तिच्या सभोवतालची सर्व लोकसुद्धा फोनवर बोलताना दिसतात. नेमकं शिवानी आणि अंकुश यांच्यातील हे नाते काय आहे? फक्त एक मिसकॉल तुमचे आयुष्य बदलू शकतो, या संदेशाचे मोठे बॅनर अंकुशला या गाण्यात दिसते. त्या विषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.

‘ट्रिपल सीट’ मध्ये अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, शिल्पा ठाकरे, राकेश बेदी, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाट आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे सहनिर्माते स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माते ऍड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट आता 24 ऐवजी 25 ऑक्टोबर 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related posts: