|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चौपदरीकरणातील बाधित बांधकामे

चौपदरीकरणातील बाधित बांधकामे 

प्रतिनिधी/ चिपळूण

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील बाधित बांधकामे 1 ऑक्टोबरपासून पाडण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे. पूर्वीच्या आणि आता नव्याने केलेल्या रेखांकनावरून गोंधळ निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून जागेची संयुक्त मोजणी सुरू करण्यात आली आहे.

 गणेशोत्सवापूर्वी शहरातील बाधित बांधकामे तोडण्यास सुरूवात झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ऐन गणेशोत्सवातच कारवाई सुरू केल्याने त्याला आक्षेप घेण्यात आला होता. शिवाय त्यावेळी केल्या गेलेल्या रेखांकनामध्येही 3 ते 5 फुटापर्यंत तफावत आढळून आल्याने गोंधळ वाढत चालला होता. शेवटी बांधकाम हटवण्याचे काम स्थानिकांनी रोखून धरल्यानंतर तत्कालिन तहसीलदार जीवन देसाई यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये गणेशोत्सवापर्यंत बांधकामांना हात लावू नये, अशी सूचना करतानाच रेखांकनातील तफावतीमुळे संबंधित खात्यांचे अधिकारी आणि जागा मालक यांच्या उपस्थितीत संयुक्त मोजणी करून मगच बांधकामे तोडण्यात यावीत, असे ठरवण्यात आले.

  यानुसार गेल्या दोन दिवसांपासून महामार्गावर भूमी अभिलेख, महसूल, महामार्ग अधिकाऱयांसह नागरिकांच्या उपस्थितीत संयुक्त मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून बाधित बांधकामे पाडण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आलेले असले तरी मोजणी पूर्ण झाल्यास शक्यतो सोमवारपासून मोहीम हाती घेतली जाईल, अशी माहिती महामार्ग विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

Related posts: