|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अफगाणिस्तानात अध्यक्षीय पदासाठी मतदान

अफगाणिस्तानात अध्यक्षीय पदासाठी मतदान 

हिंसाचाराच्या अनेक घटना : अफगाणिस्तान भारताचा महत्त्वाचा सहकारी

वृत्तसंस्था/ काबूल

अफगाणिस्तानमध्ये कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या मतदानात लोकांनी शनिवारी भाग घेतला. या मतदानाला रोखण्यासाठी तालिबानने देशभरात अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणले आहेत. या स्फोटांमध्ये किमान एका व्यक्तीला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. 2011 मध्ये तालिबानची क्रूर राजवट संपुष्टात आल्यावर देशातील ही चौथी सार्वत्रिक निवडणूक आहे.

अफगाणिस्तानची लोकसंख्या सुमारे 3 कोटी 50 लाख इतकी असून यंदा 96 लाख मतदारांची नोंदणी झाली होती. या निवडणुकीकरता 72 हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते, यात 990 महिलांचा समावेश होता. 33 राज्यांमध्ये 5373 मतदान केंद्रांमध्ये 1.10 लाख कर्मचाऱयांना नियुक्त करण्यात आले होते. भारताला अफगाणिस्तानचा सर्वात मोठा सहकारी मानले जाते.

शांतता चर्चेची पार्श्वभूमी

ऑक्टोबर 2018 मध्ये तालिबान आणि अमेरिकेदरम्यान शांतता चर्चा सुरू झाली होती. पण चालू महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता चर्चा रद्द करण्याची घोषणा केली होती. काबूल येथील हल्ल्यात एका अमेरिकेच्या सैनिकाला जीव गमवावा लागल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता.

निवडणुकीतील मुख्य दावेदार

अफगाणिस्तानच्या निवडणुकीत 16 उमेदवार उभे आहेत. नॅशनल असेंब्ली किंवा वोलेसी जिरगा (कनिष्ठ सभागृह)च्या 249 जागा आणि मेशरानो जिरगा (वरिष्ठ सभागृह) 102 जागांसाठी मतदान पार पडले आहे. वोलेसी जिरगामध्येच कायद्यांची निर्मिती होते तसेच त्यामध्ये दुरुस्ती केली जाते. मेशरानो जिरगा सल्लागाराच्या भूमिकेत असते. या निवडणुकीत 6 प्रमुख चेहरे आहेत.

भारताची भूमिका

अफगाणिस्तानच्या 31 प्रांतांमध्ये भारताचे 116 प्रकल्प सुरू असून त्यांचा खर्च 2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिसेंबर 2015 मध्ये अफगाणिस्तानच्या संसदेचे उद्घाटन केले होते. संसदेची निर्मिती भारताच्या निधीतून करण्यात आली असून याच्या कक्षाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. भारताने इराणमधील चाबहार बंदराचा विकास चालविला आहे. हे बंदर अफगाणिस्तानच्या आर्थिक घडामोडींसाठी महत्त्वाचे द्वार ठरणार आहे.

1) अशरफ गनी : दुसऱयांदा अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्वतःला दौलत साज म्हणजेच देशाचे निर्माते ठरवत आहेत. 

2) अब्दुल्ला अब्दुल्ला : सद्यस्थितीत अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2014 च्या निवडणुकीनंतरच हे पद निर्माण करण्यात आले होते. अब्दुल्ला यांच्याशीच गनी यांची मुख्य लढत होणार आहे. स्थैर्य आणि एकीकरण या मुद्यांना प्रचारात विशेष स्थान दिले होते.

3) अहमद वली मसूद : रशिया-तालिबान विरोधी कमांडर राहिलेले अहमद शाह मसूद यांचे कनिष्ठ बंधू आहेत. ताजिक समुदायाशी संबंधित असलेले मसूद हे ब्रिटनमध्ये अफगाणिस्तानचे राजदूत राहिले आहेत.

4) गुलबुद्दीन हिकमतयार : माजी कमांडर राहिलेले हिकमतयार हे युद्धगुन्हय़ांचे आरोपी होते. त्यांच्यावर 1990 च्या दशकात अफगाण गृहयुद्धादरम्यान हजारो नागरिकांची हत्या करविल्याचा आरोप होता. 2016 च्या शांतता करारांतर्गत त्यांना माफी देण्यात आली. दोन दशकांपर्यंत बाहेर राहिल्यावर हिकमतयार मे 2017 मध्ये देशात परतले होते.

5) अब्दुल लतीफ पेदराम : ताजिक समुदायाशी संबंधित पेदराम हे सद्यकाळात खासदार आहेत. महिलांचे अधिकार तसेच संघीय प्रणालीसाठी आवाज उठविणारे प्रमुख नेते आहेत.

6) रहमतुल्ला नबील : दोनवेळा अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख राहिले आहेत. तालिबान आणि अशरफ गनी यांचे कठोर टीकाकार आहेत.

Related posts: