|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » गुलालाई : पाकमधील मानवाधिकारांच्या लढाईचा नवा चेहरा

गुलालाई : पाकमधील मानवाधिकारांच्या लढाईचा नवा चेहरा 

पाक सैन्याविरोधात लिखाणामुळे देश सोडण्याची वेळ : न्यूयॉर्कमधील निदर्शनांचे केले नेतृत्व

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क 

 पाकिस्तानातून सुटका करण्यास यशस्वी ठरलेली महिला अधिकार कार्यकर्ती गुलालाई इस्माइल अमेरिकेत पाकिस्तानविरोधी निदर्शनांची चेहरा ठरली आहे. राजनयिक शरणार्थी म्हणून वास्तव्याची अनुमती गुलालाई सध्या संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागत आहे.

  न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर पाकमधील अल्पसंख्याकांवर होणाऱया अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करताना ती दिसून आली होती. महिन्याभरापूर्वीच ती न्यूयॉर्कमध्ये दाखल झाली होती. पाकचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधित करत असताना गुलालाई जागतिक संस्थेच्या मुख्यालयाबाहेर मुहाजिर, पश्तून, बलूच, सिंधी आणि उर्वरित अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांसह पाकविरोधी निदर्शने करत होती.

दहशतवाद संपविण्याच्या नावाखाली पाकिस्तानात निर्दोष पश्तूनांची हत्या केली जातेय. सैन्याच्या यातना छावण्यांमध्ये हजारो लोकांना डांबण्यात आले आहे. पाक सैन्याकडून होणारे मानवाधिकारांचे उल्लंघन त्वरित रोखले जावे, यातना छावण्यांमधील लोकांची सुटका करण्याची मागणी तिने केली आहे.

पाक सैन्याच्या विरोधात आवाज उठविल्यास आमच्यावर दहशतवादाचा आरोप लावला जातो. खैबर पख्तूनख्वा प्रांतात सैन्य संस्थांची हुकुमशाही आहे. पश्तून हे युद्धपीडित असून अमेरिकेत राहून त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठविणार असल्याचे तिने म्हटले. पाक सरकारने गुलालाईचा आवाज दडपण्यासाठी सर्व यंत्रणांचा गैरवापर करत तिचा छळ केला होता. पाक सरकारने गुलालाईच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी तिच्या कुटुंबावर दडपण आले होते. सरकारचे दडपण झुगारून तिचे कुटुंब गुलालाईच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. गुलालाईचा लढा मोडून काढण्यासाठी पाकने तिच्या आईवडिलांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

पाकविरोधात घोषणा

‘नो मोअर ब्लँक चेक्स फॉर पाकिस्तान’ (पाकला आता कुठलीच मनाजोगी मदत नको) आणि ‘पाकिस्तान आर्मी स्टॉप मेडलिंग इन पॉलिटिक्स’ (सैन्याने राजकारणात नाक खुसपणे बंद करावे) अशा घोषणा तिने दिल्या आहेत.

पाकिस्तानी सैन्याचे क्रौर्य केले उघड

गुलालाईने मे महिन्यात फेसबुक आणि ट्विटर पोस्टद्वारे पाकिस्तानी सैनिकांकडून महिलांवर झालेले बलात्कार तसेच अत्याचाराचे मुद्दे मांडले होते. या धाडसामुळे हादरलेल्या पाक सैन्याने तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नेंदविला होता. पाकिस्तानात अडचणी वाढल्याने गुलालाई मित्रांच्या मदतीने श्रीलंकेत पोहोचली होती. श्रीलंकेतून तिने अमेरिकेत जाण्यास यश मिळविले आहे. सद्यस्थितीत गुलालाई न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये बहिणीसह राहत आहे.

Related posts: