|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘युएन’मध्ये भारताचे पाकिस्तानला रोखठोक प्रत्युत्तर

‘युएन’मध्ये भारताचे पाकिस्तानला रोखठोक प्रत्युत्तर 

दहशतवाद्यांची निर्मिती करणाऱयांकडून प्रमाणपत्राची गरज नसल्याची स्पष्टोक्ती

संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भाषणाला भारताने रोखठोक प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेले भाषण प्रक्षोभक आणि बेजबाबदारपणाचे होते. दहशतवाद्यांची निर्मिती करणाऱयांकडून भारताला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही, अशा कठोर शब्दात संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी उत्तर दिले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेच्या 74 व्या अधिवेशनाला शुक्रवारी संबोधित केले. हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे जगभरातील नेत्यांसह आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासकांचे लक्ष होते. पंतप्रधान मोदींनी वैश्विक शांततेचा सल्ला देत सर्वांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असतानाच इम्रान खान यांनी मात्र भारतावर वैयक्तिक पातळीवर टीका करत रोष ओढवून घेतला आहे. त्यांच्या या भाषणावर भारताने ‘राईट टू रिप्लाय’मध्ये खरपूस समाचार घेतला आहे. ‘संपूर्ण जगाने पाकिस्तानात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे. पाकिस्तान केवळ मानवाधिकाराचा कळवळा असल्याचे दाखवत आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवरही अत्याचार होत आहेत. असे असताना काश्मीरबाबत गरळ ओकून पाकिस्तानने स्वतःची पत आणखी कमी केली आहे, असा हल्लाबोल विदिशा मैत्रा यांनी आपल्या भाषणात केला.

पाकिस्तान दहशतवादावर जोर देत आहे, तर भारत विकासावर जोर देत आहे. दहशतवादावर इम्रान खान यांनी केलेले दावे खोटे आहेत. यापूर्वी पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची संख्या 27 टक्के होती. परंतु आता ती घसरून 3 टक्क्मयांवर आली आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. तेथे पूर्वीचीच परिस्थिती अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट करत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या मंचाचा दुरुपयोग केला, असे मैत्रा यांनी पाकिस्तानला ठणकावले.

आमसभेमध्ये पाकिस्तानचे नाव न घेता भारतीय पंतप्रधान मोदी वैश्विक शांतता आणि कट्टरतावादावर बोलले. भारताने विकासाच्या क्षेत्रात कशी वाटचाल केली याचे वर्णन त्यांनी जगासमोर मांडले. दुसरीकडे इम्रान यांनी जागतिक व्यासपीठावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आंतरराष्ट्रीय पटलावर काश्मीरचा मुद्दा मांडला. दोन्ही देशांदरम्यान युद्ध झाले तर दोन्ही देशांचे नुकसान होऊ शकते, असेही ते म्हणाले होते.

इम्रान खान यांच्यावर आरएसएसचे टीकास्त्र

आमसभेतील भाषणात इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उल्लेख केला होता. आरएसएसचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल शर्मा यांनी उपहासात्मक पद्धतीने इम्रान खान यांचा समाचार घेतला. आरएसएसची भारताव्यतिरिक्त जगात कुठेही शाखा नसताना पाकिस्तान संघावर नाराज का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच पाकिस्तान आरएसएसला उगाचच जागतिक पातळीवर प्रसिद्धी देत आहे, असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची वाहवा !

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बैठकीत जगाचे लक्ष फ्रान्स, चीन आणि रशियाचे नेते काय बोलतात याकडे लागलेले असते. मात्र, यंदाच्या आमसभेदरम्यान सर्वांचे लक्ष भारत आणि पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणाकडे लागले होते. मोदींनी आपल्या 17 मिनिटांच्या भाषणात वैश्विक शांततेच्या मुद्याला हात घातल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांचीच वाहवा मिळविली आहे.

Related posts: