|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात विनाचालक पिकअपचा थरार

साताऱयात विनाचालक पिकअपचा थरार 

2 लाख नुकसानीचा अंदाज : मंदिराच्या भिंतीमुळे पुढील अनर्थ टळला

प्रतिनिधी/ सातारा

चालक गाडी चालवत असताना अपघात होतच असतो. मात्र, शनिवारी सदरबझार परिसरात एक गॅस सिलेंडरची गाडी सिलेंडरसह चालकविना धावू लागली आणि परिसरात मोठा थरार निर्माण झाला. विनाचालक धावू लागलेल्या गाडीने रस्त्यावर पार्किंग केलेल्या एका सायकलसह तीन दुचाक्या चिरडत शेवटी ती हनुमान मंदिराच्या भिंतीला जावून धडकली. यामध्ये अपघातात दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज असून ही सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली.

भारत गॅसचे वितरक असलेल्या साळुंखे डॉटर्सची महेंद्रा पीकअप गाडी क्रमांक एम. एच. 11 बी.एल. 5627 वरील चालक व त्याचा मदतनीस सिलेंडर घेवून सदरबझारमध्ये गेले होते. सकाळी 10 च्या सुमारास गाडीचा चालक सिलेंडरची डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता. ही गाडी ढकलस्टार्ट असल्यामुळे चालकाने बंद केली नव्हती. तो सिलेंडर पोहोचवण्यास गेल्यानंतर अचानक गाडी उताराने धावू लागली. या गाडीत भरलेल्या गॅस सिलेंडरच्या टाक्या होत्या. हनुमान मंदिरासमोर ही विना चालक गॅस सिलेंडरची गाडी सुसाट धावली. या गाडीने रस्त्यालगत पार्किंग केलेल्या दोन तीन दुचाकी चिरडल्या आहेत. पुढे जावून ही गाडी भिंतीला धडकल्याने मोठा अनर्थ टळला.

 ही गाडी भिंतीला धडकून थांबली नसती तर मोठा दुर्घटना घडली असती. हा थरार पाहणाऱयांची मात्र चांगलीच पाचावर धारण झाली. हा थरार येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली. गाडी कोठे गेली म्हणून त्यावरील चालक व त्याचा मदतनीस तिथे पोहोचले.   ज्यांचे दुचाकींचे नुकसान झाले होते ते संताप व्यक्त करत होते.

साळुंखे डॉटर्सचा चालक मात्र त्याच्याकडून काहीच झाले नसल्याच्या गुर्मीत वावरत होता. शेवटी अपघातस्थळी पोलीस हजर झाले; पण नुकसान भरपाई कोणी द्यायची हे काही ठरत नव्हते. नागरिकांमधून बेशिस्त चालकाबाबत संतप्त भावना व्यक्त होत होत्या. घटनास्थळापासून जवळच असलेल्या सदरबझार पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान, भिंतीला धडकून गाडी थांबली, अन्यथा यात जीवितहानीही झाली असती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱयात झाले आहे.

 

 

Related posts: