|Friday, October 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » ग्लॅमरस स्ट्राईप्समध्ये रंगले झी मराठी ऍवॉर्ड्स नॉमिनेशन्स

ग्लॅमरस स्ट्राईप्समध्ये रंगले झी मराठी ऍवॉर्ड्स नॉमिनेशन्स 

झी मराठीवरील मालिका आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी ऍवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठय़ा थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणत्या कुटुंबाला नामांकन मिळेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. मुख्य पुरस्कार सोहळय़ा इतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो हा नामांकनाचा सोहळा. यंदा प्रेक्षकांची लाडकी वाहिनी झी मराठी हिने 20 वर्षे पूर्ण केले. त्यामुळे या सेलिब्रेशनला एक वेगळीच रंगत होती. एका विशिष्ट थीमवर आधारित असलेल्या या सोहळय़ाची यावर्षी ग्लॅमरस स्ट्राईप्स अशी थिम होती.

झी मराठी ऍवॉर्ड्स 2019 ची नॉमिनेशन पार्टी शुक्रवारी मुंबईत पार पडली. या पार्टीला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱया लाडक्या कलाकारांनी ग्लॅमरस स्ट्राईप्स या थीम अनुसार तयार होऊन या पार्टीला चार चांद लावले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन चला हवा येऊ द्या मधील डॉक्टर निलेश साबळे आणि सगळय़ांची लाडकी शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी केले. यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱयाची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले 2, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे. सर्वोकृष्ट अभिनेता, सर्वोकृष्ट अभिनेत्री, सर्वोकृष्ट बहीण-भाऊ, सर्वोकृष्ट जोडी, सर्वोकृष्ट कुटुंब, सर्वोकृष्ट मालिका या आणि अशा अनेक विविध श्रेणीत यावेळी नामांकन जाहीर करण्यात आली.

या नामांकन सोहळय़ात अभिजीत खांडकेकर, अनिता दाते-केळकर, ईशा केसकर, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, धनश्री काडगांवकर, चेतन वडनेरे, शिवानी बावकर, अतुल परचुरे, दीप्ती केतकर, तेजश्री प्रधान यांच्यासह झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील सर्व कलाकारांची उपस्थिती होती. पार्टीत सर्वच सेलिब्रिटींनी भरपूर धमाल तर केलीच पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत हे लवकर कळेल. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्यांना वोट करून जिंकवू शकतात.