|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाक दुर्लक्षित, भारतात प्रचंड गुंतवणूक

पाक दुर्लक्षित, भारतात प्रचंड गुंतवणूक 

सौदी अरेबियाच्या भूमिकेत होतोय बदल : 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची तयारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

काश्मीरप्रकरणी इस्लामचा दाखला देत समर्थन जमविण्याच्या प्रयत्नात सपशेल अपयशी ठरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सौदी अरेबियाकडून मोठी अपेक्षा बाळगून होते. पण सौदी अरेबियाला भारतासोबतच्या व्यापारी संबंधांमध्ये लाभ दिसून येतोय. सौदी अरेबिया भारतातील पेट्रोरसायन, पायाभूत तसेच खाणकामासह अन्य क्षेत्रांमध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. भारत गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण असून सौदी अरेबिया दीर्घकालीन भागीदारीचा विचार करत असल्याचे विधान त्या देशाचे राजदूत डॉ. सौद बिन मोहम्मद अल साती यांनी केले आहे.

सौदीची सर्वात मोठी तेल कंपनी अराम्कोच्या भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत प्रस्तावित भागीदारीमुळे दोन्ही देशांदरम्यान ऊर्जा संबंधांचे धोरणात्मक स्वरुप स्पष्ट होते. भारताला तेलपुरवठा, किरकोळ इंधनविक्री, पेट्रोरसायन आणि ल्युब्रिकेंट बाजारात गुंतवणुकीची योजना या क्षेत्रांमध्ये अराम्कोच्या जागतिक विस्ताराच्या धोरणाचा हिस्सा असल्याचे ते म्हणाले.

युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन 2030 मुळेही दोन्ही देशांदरम्यान विविध क्षेत्रांमध्ये व्यापार आणि व्यवसायात उल्लेखनीय विस्तार होणार आहे. व्हिजन 2030 अंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवरील आर्थिक निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे साती यांनी सांगितले आहे.

व्यापारात वृद्धी दिसणार

भारत स्वतःच्या गरजेच्या 17 टक्के कच्चे तेल तर 32 टक्के एलपीजी सौदी अरेबियाकडून खरेदी करतो. 2019 मध्ये दोन्ही देशांदरम्यान विविध क्षेत्रांमध्ये संयुक्त भागीदारी आणि गुंतवणुकीच्या 40 हून अधिक संधींची ओळख पटविण्यात आली आहे. 34 अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापारात वृद्धी दिसून येणार असल्याचे राजदूत म्हणाले.

द्विपक्षीय संबंधांमध्ये विश्वास

द्विपक्षीय संबंध यापूर्वीच कच्चे तेल आणि एलपीजी पुरवठय़ाच्या पुढे पोहोचले आहेत. पेट्रोरसायन आणि शोध यासारख्या क्षेत्रांमध्ये संयुक्त भागीदारी आणि गुंतवणुकीवर भर दिला जातोय. भारताकडून सौदी अरेबियाला धोरणात्मक पेट्रोलियम भांडारात गुंतवणुकीचे निमंत्रण मिळणे दोन्ही देशांमधील परस्पर विश्वासाचा ठोस पुरावा असल्याचे सौदी राजदूतांनी म्हटले आहे.

Related posts: