|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पृथ्वीराजबाबा दोन दिवसांत निर्णय घेणार

पृथ्वीराजबाबा दोन दिवसांत निर्णय घेणार 

कराड दक्षिणमधूनच लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह

प्रतिनिधी/ कराड

सातारा लोकसभा पोटनिवडणूक की दक्षिण कराड विधानसभेची निवडणूक लढवायची, याबाबत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची इच्छा, दक्षिण कराडमधील कार्यकर्त्यांची इच्छा व आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल तो निर्णय दोन दिवसांत घेणार आहे. जो काही निर्णय होईल, तो दक्षिण कराडच्या जनतेला केंद्रबिंदू मानून घेण्यात येईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. दरम्यान, केंद्र सरकारवर कडाडून टीका करत भाजपा सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी महाराष्ट्राचे वैचारिक केंद्र असलेल्या कराडमधून क्रांतीची सुरूवात करा, असे आवाहनही त्यांनी केले.

कराड दक्षिण काँग्रेसचा व बुथ कमिटी कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी येथील पंकज लॉनमध्ये पार पडला. माजी मंत्री राजेंद्र मुळक, अजितराव पाटील चिखलीकर, डॉ. इंदजित मोहिते, शिवराज मोरे, झाकीर पठाण, नगराध्यक्षा नीलम येडगे, मनोहर शिंदे यांची उपस्थिती होती. गेले चार दिवस सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव येत असल्याने या मेळाव्यास महत्व प्राप्त झाले होते. कार्यकर्त्यांनीही हजारोंच्या संख्येने गर्दी करत बाबांना दक्षिण कराडमधूनच लढण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमकपणे आपला सूर व्यक्त केल्याने काँग्रेस चार्ज झाल्याचे दिसत होते. कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन चव्हाण यांनी दोन दिवसांत निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणूक व दक्षिण कराडच्या उमेदवारीचा संभ्रम कायम राहिला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दक्षिण कराडच्या जनतेने आपणावर प्रचंड प्रेम केले आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील प्रत्येक गावात निधी दिला. नेतृत्व जपावे लागते. जे लोक आपले नेतृत्व जपतात, असेच नेते देशपातळीवर मोठे झाले आहेत. सद्या काँग्रेस पक्षासाठी कठीण काळ असून निवडणुकीबाबत सगळय़ांशी चर्चा करणार आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून या जिल्हय़ात पुन्हा काँग्रेस बळकट करण्याचा विडा कार्यकर्त्यांनी उचलावा. आपल्या उमेदवारीबाबत जो काही निर्णय होईल, तो कराडच्या जनतेला केंद्रबिंदू मानून होईल. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने नवी काँग्रेस उभारण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

आज देश संकटात असून काँग्रेस पक्षासमोरही अडचणी आहेत. भाजप सरकार विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे ही विचारांची लढाई असून नेते गेले तरी कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. ईडी, सीबीआयची भीती दाखवली जात असून उद्या माझीही ईडीकडून चौकशी झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असे सांगून चव्हाण म्हणाले की, शरद पवार यांचे नाव 25 हजार कोटींच्या घोटाळय़ात आले. मुख्यमंत्री पाच वर्षे झोपले होते का? या घोटाळय़ाचे पुरावे त्यांनी दिले पाहिजेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपला दक्षिणच्या जनतेशी संपर्क येत नव्हता. मात्र मुख्यमंत्री झाल्यापासून मी येथे संपर्क ठेवला आहे. प्रत्येक गावात निधी दिला. हजारमाचीत केंद्रीय विश्वविद्यालयाची मंजुरी आपण आणली, असेही ते म्हणाले.

माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनीही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात आज जी कामे सुरू आहेत, ती पृथ्वीबाबांच्या काळात मंजूर झाली असल्याचा दावा  केला. स्वत:वर विश्वास नसणारी मंडळी पक्ष सोडत आहेत. महाराष्ट्राच्या विकासात दीर्घकालीन परिणाम करणारी धोरणे बाबांच्या काळात मंजूर झाली आहेत. पक्षाचा तिर्णय व्हायचा तो होईल, कार्यकर्त्यांनी दक्षिणमध्ये तयारी करावी, असे आवाहन केले. डॉ. इंद्रजित मोहिते, शिवराज मोरे, राजेंद्र यादव, झाकीर पठाण, जयवंत जगताप यांची भाषणे झाली.

आनंदरावांचे नाव घेण्यास तीव्र विरोध

पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी भाषणात बाबा-नाना वादात केलेल्या मध्यस्तीची माहिती देताना आमदार आनंदराव पाटील यांचे नाव घेतले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना नाव घेऊ नका, असे सांगत विरोध केला. बंडानाना जगताप यांनीही, पक्षातले काही लोक बाजूला झाल्याने आज कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी झाल्याचे सांगितले. तर बाबांच्या रूपाने मुख्यमंत्रीपद कराडमध्ये असून राज्यमंत्रीपदाची उद्बत्ती कशाला सारखी लावताय, अशी टीका एका कार्यकर्त्यांने भोसले गटावर केली. भोसले गटावर अनेक कार्यकर्त्यांनी टीका केली.

चांद्रयान दोनची मंजुरी आमच्या काळात

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणून आपणाला संधी मिळाली. त्यावेळी मी अंतरिक्ष खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सप्टेंबर 2008 मध्ये चांद्रयान दोनला मंजुरी दिली. त्याचे उड्डाण 2013 मध्ये होणार होते. मात्र रशियाने करारातून अंग काढून घेतल्याने हे उड्डाण 2019 मध्ये झाले. त्यात थोडे अपयश आले. चांद्रयान एकला अटलबिहारी वाजपेयी यांनी मंजुरी दिली होती. त्याचे उड्डाण 2008 मध्ये आमच्या काळात यशस्वीपणे झाले. त्यावेळी मी केंद्रीय मंत्री म्हणून तिथे जाऊ का, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विचारले होते. मात्र आजचा दिवस वैज्ञानिकांचा असून तू जाऊ नकोस, असे पंतप्रधानांनी मला सांगितले होते. आम्ही कधीही क्रेडीट घेतले नाही. आजचे सरकार वेगळे आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

Related posts: