|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुडचडेतील रस्त्यांची स्थिती सुधारणार कधी ?

कुडचडेतील रस्त्यांची स्थिती सुधारणार कधी ? 

प्रतिनिधी/ कुडचडे

 

गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यांची स्थिती सुधारण्याची अपेक्षा असलेल्या कुडचडेवासियांना चतुर्थीच्या दिवसांत खड्डे पडलेल्या रस्त्यांवर वाहने चालवून धक्के खावे लागले होते. चतुर्थीचा उत्सव संपून नवरात्रोत्सव सुरू झाला, तरी रस्त्यांवर तोच देखावा दिसत असल्याने कुडचडे नगरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यास सुरुवात का केली जात नाही, असा प्रश्न लोकांकडून विचारला जाऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते याकडे लक्ष देत नसल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कुडचडे बाजारात तसेच अन्य बऱयाच ठिकाणी रस्त्यांवर खड्डय़ांची रांग लागलेली आहे. पण सदर खड्डे बुजविण्याचे कोणतेच प्रयत्न सरकारकडून होताना दिसून येत नाही. याअगोदर काही ठिकाणच्या खड्डय़ांत स्वयंसेवी संस्थांनी दगड टाकून लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले होते. पण त्यानंतरही रस्त्यांची स्थिती तशीच राहिली असल्याचे निदर्शनास येत आहे. यात रेल्वे स्टेशन रोड, शिवाजी चौक, गोवा बागायतदारच्या बाजूचे तीन रस्ते व अन्य बऱयाच ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत.

सध्या पावसाचा जोर बऱयाच प्रमाणात कमी झाला आहे. तरी देखील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू होण्याची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे कुडचडेचे आमदार असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी यात लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे. बऱयाच ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांत चारचाकी वाहनाचा टायर अर्ध्याहून जास्त आतमध्ये जाताना दिसून येत आहे. काही ठिकाणी खड्डय़ांमुळे दुचाकीचालकांना अपघात घडले आहेत. कुडचडे पालिकेने तरी जनतेच्या हिताच्या दृष्टीने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

पाऊस थांबताच लगेच दुरुस्ती : नगराध्यक्ष

कुडचडे पालिकेद्वारे मध्यंतरी बजारातील काही मुख्य ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. पण पावसाच्या जोर वाढल्याने खड्डय़ांमध्ये वाढ झाली आहे, याकडे यासंदर्भात बोलताना नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांनी लक्ष वेधले. यासंबंधी मंत्री काब्राल यांच्याकडे बोलणी झाली असून या दिवसांत पाऊस पडत असल्यामुळे आणि सदर कामासाठी आणलेले यंत्र पावसात काम करू शकत नसल्यामुळे काम स्थगिती करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तरी पावसाच्या सरी थांबताच काम सुरू करण्यात येईल व अवघ्या दोन ते तीन दिवसात खड्डे पडलेले कुडचडेतील रस्ते व्यवस्थित करण्यात येतील, असे आश्वासन होडारकर यांनी दिले.

Related posts: