|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सतीश सावंतांचा ‘स्वाभिमान’ला रामराम

सतीश सावंतांचा ‘स्वाभिमान’ला रामराम 

‘राणेंनी दाखविलेल्या अविश्वासाबद्दल दुःख!’ : पुढील भूमिका लवकरच!

वार्ताहर / कणकवली:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावरही सोमवारी राजकीय भूकंपाचा धक्का बसला. गेली 24 वर्षे नारायण राणेंचे अत्यंत निकटवर्तीय ओळखले जाणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष, जि. प. सदस्य सतीश सावंत यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत राणेंपासून फारकत घेत असल्याचे जाहीर केले. ‘आपण अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे निश्चित केलेले नाही. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण गेली दहा वर्षे इच्छुक होतो. त्यामुळे या निवडणुकीतही संधी मिळाल्यास निश्चित लढू’, असे सावंत यांनी सांगतानाच राणेंनी आपल्यावर दाखविलेल्या अविश्वासाबद्दल दु:ख होत असल्याचेही सांगितले.

कलमठ येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, गेली 24 वर्षे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सोबत काम करतोय.  मात्र, अलिकडे कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या निर्णय प्रक्रियेत मला नीतेश राणेंनी सामावून घेतले नाही. 24 वर्षे राणेंसोबत काम करूनही मला काही दिवसांपूर्वी कुडाळ-मालवणमधून अपक्ष निवडणूक लढविण्याबाबत नारायण राणेंनी आमदार नीतेश राणेंमार्फत निरोप दिला. नारायण राणेंनी सोमवारी दुपारी मला फोन करून माझ्याबाबत अविश्वास दाखविला. त्यामुळे आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्तेपद व सदस्यपदाचा राजीनामा दिल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष व नारायण राणेंचे निकटवर्तीय असणारे सतीश सावंत यांनी दिली.

सहकाराला विकासाची जोड!

सावंत म्हणाले, सहकाराला राजकारणाची जोड देत जिल्हय़ाचा विकास हा माझा अजेंडा आहे. त्यासाठी मी गेली अनेक वर्षे काम करीत आहे. त्यामुळे सत्ताधारी असलेल्या शिवसेना किंवा भाजपमध्ये याबाबत लवकरच मी भूमिका निश्चित करेन. 2009 पासून मी आमदारकीसाठी इच्छुक होतो. मला विधान परिषदेची आमदारकी देण्याबाबतही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, आता वेळ आल्यावर मला कुडाळ-मालवणमधून अपक्ष निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मला वेदना झाल्याचे सावंत म्हणाले.

पदे जनतेसाठी वापरली!

सावंत म्हणाले, मी जिल्हय़ात असताना माझ्याबाबत चुकीच्या चर्चा करण्यात आल्या. मी मातोश्रीवर गेलो, खासदार विनायक राऊत यांच्या सोबत मी माझ्या फार्महाऊसवर स्नेहभोजन घेतले, असे आरोप माझ्यावर करण्यात आले. माझ्याबद्दल पक्षांतर्गत हितशत्रूंमधून गैरसमज पसरविण्यात आले. जि. प., जिल्हा बँक ही पदे मी जनतेसाठी वापरली. स्वाभिमान पक्षाची ज्या उद्देशाने स्थापना करण्यात आली, तो उद्देश सार्थ ठरत नसल्याने मी राजीनामा दिला. भविष्यात शेतकरी, मच्छीमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी जो पक्ष सहमती देईल व माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान करेल, त्या पक्षासोबत मी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन पर्याय समोर आहेत!

  24 वर्षात राणेंसोबत काम करताना त्यांची साथ सोडताना दु:ख होत असले, तरी जनतेच्या प्रश्नांसाठी मी हा निर्णय घेतला आहे. माझ्यावर जर राणेंचा विश्वास राहिला नाही, तर त्यांच्या सोबत राहणे चुकीचे असल्याचे माझे मत झाले आहे. कणकवली विधानसभेसाठी 2009 पासून माझ्या नावाची चर्चा होती. मात्र, आमदार होणे हाच माझा अट्टाहास नव्हता, असे सावंत म्हणाले. इतर कोणत्याही राजकीय पक्षांनी माझ्याशी संपर्क साधला नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी म्हणून शिवसेना व भाजप हे माझ्यासमोर दोन पर्याय आहेत. तसेच मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्याने माझ्यावर कारवाईचा काँग्रेस पक्षाला सोडून अन्य कुणाला अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले.

डबलबारीची वेळ आणू नका!

  कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार का? या प्रश्नावर त्यांनी जर-तरची उत्तर आज द्यायचं नाही. मात्र, शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली, तर ती नाकारणार नाही, असे त्यांनी सांगितले. मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असल्यापासून कणकवली मतदारसंघातील निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले नाही. फोंडाघाट येथील धरणाच्या कॅनॉलच्या प्रश्नी तेथील ग्रामस्थांना घेऊन मी अडीच वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली, तेव्हा नीतेश राणे यांनी मला माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप का करता, असा प्रश्न केला. मात्र, आता माझ्यावर आरोप करत डबलबारी करण्याची वेळ आणू नये, असा इशारा त्यांनी दिला.

अपक्ष निवडणूक लढविण्यास सांगितल्याने नाराज!

 जनतेच्या प्रश्नांसाठी योग्य वेळ येताच अन्य पदांचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या आग्रहास्तवच मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणेंसोबत माझी 10 दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यावेळी व त्यापूर्वीही मी माझी भूमिका त्यांच्याकडे मांडली होती. तसेच मला अपक्ष निवडणूक लढवायला सांगितल्याने मी नाराज होतो, असे सावंत म्हणाले. नारायण राणे हे भाजपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहेत व स्वाभिमान पक्षाने अजून निवडणूक अर्ज मागणी प्रक्रियाच सुरू केली नसल्याचे सावंत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मी कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायचे हे अद्याप निश्चित केले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पदांना न्याय देण्याचा प्रयत्न!

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्याकडे पत्राद्वारे मी पक्ष सदस्यत्व व प्रवक्तेपदाचा राजीनामा सोपविला आहे. महाविद्यालयीन जीवनापासून मी राजकारण व समाजकारणात काम करत असताना माजी आमदार केशवराव राणे यांच्या माध्यमातून मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून राजकीय सुरुवात केली. 1995 मध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून आतापर्यंत मी राणेंसोबत निष्ठेने काम केले. गेल्या 24 वर्षांच्या काळात माझ्यावर विश्वास ठेवून राणे यांनी जि. प. अध्यक्ष, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँक अध्यक्ष आदी अनेक पदे व मान-सन्मान दिला. पदांना न्याय देण्याचे काम मी केले. स्वाभिमान पक्षाची स्थापना करताना पक्षाची जी धेय्य-धोरणे ठरली होती, ती साध्य करण्यासाठी मी राणेंसोबत काम केले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आम्ही कमी पडलो म्हणूनच लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पक्षात घेण्यात येणारे निर्णय व केलेली आंदोलने आपल्या गतकाळच्या विचारांशी जुळणारी नव्हती. त्यामुळे मी अस्वस्थ होतो.

जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले!

सावंत म्हणाले, आमदार नीतेश राणे यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्णत्वास गेली नसल्याने जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागले. आतापर्यंत पहिल्यांदाच माझ्यावर राणेंनी आरोप केले. माझ्याकडे आरोपांबाबत विचारणा न करता चुकीची माहिती पुरविणाऱयांना उत्तर देणे अपेक्षित होते, असे सावंत म्हणाले. यावेळी सावंत समर्थक व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

आरोप झाल्यास जशास तसे उत्तर!

मी गेली 24 वर्षे नारायण राणेंसोबत एकनिष्ठेने राहिलो. मात्र, आज माझ्या निष्ठेला आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे सावंत यांनी सांगितले. माझा पिंडच हा शेतकरी असून मला शेतकऱयांच्या प्रश्नांची जाण आहे. माझ्यावर भविष्यात आरोप झाले, तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला.

Related posts: