|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बेटकरांचा सभापतीपदाचा राजीनामा

बेटकरांचा सभापतीपदाचा राजीनामा 

प्रतिनिधी / चिपळूण

गुहागर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे सहदेव बेटकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असून बेटकर यांनी सोमवारी सायंकाळी शिक्षण व अर्थ सभापदीपदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिला आहे. बेटकर यांनी शनिवारी मांडकी-पालवण येथे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुलाखत झाली होती. तेव्हाच ते राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

   राष्ट्रवादीमधून गुहागर मतदार संघात बेटकर यांच्यासह नगराध्यक्ष राजेश बेडल, शौकत मुकादम, सुधीर भोसले, चित्रा चव्हाण आदी पाच इच्छुकांच्या मुलाखती शनिवारी झाल्या. यावेळी या मतदारसंघातील खेड, गुहागर, चिपळूणमधील संबंधित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून उमेद्वाराबाबत मत अजमावण्यात आली. त्यातून बेटकर यांचे नाव राष्ट्रवादीकडून निश्चित झाले असल्याचे समजते.

  शिवसेनेचे सदस्य असलेले बेटकर हे जिल्हा परिषद शिक्षण सभापती आहेत. कुणबी समाजाचे नेते म्हणूनही ते परिचित आहेत. गुहागर मतदारसंघात कुणबी मतदारांचे असलेले प्राबल्य लक्षात घेत बेटकर यांना या मतदारसंघात काम सुरू करण्याच्या सूचना शिवसेना नेत्यांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बेटकर यांनी कामही सुरू केले होते. मात्र राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर सेनेकडून जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज बेटकरांनी राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी नेतृत्वानेही बेटकर यांना गुहागरातून उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याने सोमवारी सायंकाळी त्यांनी आपल्या जि. प. सभापतीपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सोपवला आहे. मंगळवारी बेटकर यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादीकडून केली जाण्याची शक्यता आहे.

 

Related posts: