|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कर्मचारी आढावा बैठकीत नगराध्यक्ष बनले भावूक

कर्मचारी आढावा बैठकीत नगराध्यक्ष बनले भावूक 

साळगावकरांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने कर्मचाऱयांच्या अश्रूंचा बांध फुटला

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सावंतवाडी नगरपालिकेशी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे गेली 24 वर्षे ऋणानुबंध आहेत. मात्र, हे ऋणानुबंध रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करण्यापूर्वी ते विधानसभा निवडणूक लढविणार असल्याने तुटणार आहे. या 24 वर्षाच्या काळात पालिका कर्मचाऱयांशीही त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले होते. त्यातही आता खंड पडणार आहे. मंगळवारी पालिका कर्मचाऱयांच्या आढावा बैठकीत साळगावकर यांनी आपण नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करताच उपस्थित पालिका कर्मचारी भावनाविवश झाले. काहींना अश्रूंचे बांध फुटले. आपण पोरके होणार असल्याची भावना कर्मचाऱयांनी व्यक्त केली. साळगावकर यांनी आपणाला पालिका कर्मचाऱयांनी आतापर्यंत सहकार्य केले. आता आपण राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. आतापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. यापुढे असेच सहकार्य करावे, माझेही सहकार्य राहील, असे सांगत साळगावकरही भावनाविवश झाले.

साळगावकर 1997 मध्ये शिवसेनेतून नगरसेवक झाले. त्यानंतर ते सतत नगरसेवक म्हणून निवडून येत होते. 2011 ला ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून नगराध्यक्ष झाले. ते पाच वर्षे नगराध्यक्ष झाल्यानंतर 2016 ला थेट नगराध्यक्ष झाले. नगरसेवक ते नगराध्यक्ष या प्रवासात त्यांचा पालिका कर्मचाऱयांशी स्नेहबंध जडला. आता ते विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लढविणार आहेत. नगराध्यक्षपदाचा राजीनामाही ते देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पालिका कर्मचाऱयांची आढावा बैठक घेतली. त्यात कामांचे नियोजन करण्यात आले. तसेच साळगावकर यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेने पालिका कर्मचारी भावनाविवश झाले. आतापर्यंत ते राजीनामा देणार असल्याची चर्चा कर्मचाऱयांना ऐकायला मिळत होती. परंतु मंगळवारी त्यांनी जाहीर केल्याने त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे काही कर्मचाऱयांच्या अश्रूंचे बांध फुटले. नगराध्यक्ष म्हणून साळगावकर यांनी कर्मचाऱयांना सहकार्याची भूमिका घेतली. आता ते पालिकेत नसणार आहेत. त्यामुळे कर्मचारी पोरके होणार, अशा भावना कर्मचाऱयांनी व्यक्त केल्या. साळगावकर कर्मचाऱयांच्या प्रेमाने भावूक झाले. आपले यापुढेही कर्मचाऱयांना सहकार्य राहणार असल्याची ग्वाही दिली. यापर्वी पालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष भूषविलेले दीपक केसरकर आमदार, मंत्री झाले. परंतु आमदार होताना ते नगरसेवक नव्हते. परंतु साळगावकर यांनी निवडणूक लढविल्यास ते पदावर असताना राजीनामा देऊन निवडणूक लढविणारे पालिकेचे पहिले पदाधिकारी ठरणार आहेत.

Related posts: