|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » राणे समर्थकांकडून अर्ज खरेदी

राणे समर्थकांकडून अर्ज खरेदी 

कुडाळ विधानसभा मतदारसंघ : दत्ता सामंत, रणजीत देसाई यांचा समावेश

पहिला अर्ज दाखल 22 अर्जांची विक्री

प्रतिनिधी / कुडाळ:

कुडाळ विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी पहिला अर्ज मालवण तालुक्यातील पराड येथील सिद्धेश संजय पाटकर यांनी दाखल केला. त्यांनी भाजपाच्यावतीने एक, तर एक अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. भाजपच्यावतीने दाखल केलेल्या अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नाही.

दरम्यान, विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला, तर स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत (अपक्ष) व जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई (अपक्ष) या राणे समर्थकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मंगळवारी नऊजणांनी पंधरा अर्ज खरेदी केले. आतापर्यंत विक्री झालेल्या अर्जांची संख्या 22 आहे. माजी आमदार पुष्पसेन सावंत व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा मंगेश मुंज यांनी राष्ट्रीय काँग्रेसकडून अर्ज खरेदी केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब (अपक्ष), सचिन संजय सावंत (पिंगुळी-शेटकरवाडी) अपक्ष म्हणून, तर स्वप्नील रघुनाथ मुंज (अपक्ष, आंब्रड) आणि चेतन उर्फ अरविंद नामदेव मोंडकर (मालवण) यांनी अपक्ष म्हणून अर्ज खरेदी केला आहे.

अर्ज दाखल करायला दोनच दिवस शिल्लक

दोन ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने तीन व चार ऑक्टोबर हे अर्ज भरण्यासाठीचे दोनच दिवस शिल्लक आहेत. वैभव नाईक हे शिवसेना-भाजप युतीकडून गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सामंत-देसाईंबाबत उत्सुकता

राज्यात सेना-भाजपची युती झाली आहे. तसे जाहीर करून युतीचे उमेदवार म्हणून वैभव नाईक यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. स्वाभिमानचे अध्यक्ष व भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे, नीलेश राणे व समर्थकांचा अद्याप भाजप प्रवेश झालेला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील राजकीय समीकरणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, आज स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष व राणे यांचे कट्टर समर्थक दत्ता सामंत तसेच जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई या दोघांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून खरेदी केले. हे दोघे किंवा यापैकी एक कोणाकडून, कोणत्या पक्षाकडून की अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत, याबाबत उत्सुकता आहे.

Related posts: