|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » कलम 370 हटविणे योग्यच!

कलम 370 हटविणे योग्यच! 

लंडन  / वृत्तसंस्था :

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांचे ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी कौतुक केले आहे. कलम 370 एक चूक होती आणि पंतप्रधान मोदींनी ही चूक सुधारली आहे. या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया पाहता तो बौद्धिक दिवाळखोर झाल्याचे वाटते. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून यात कुठलाच संशय नसल्याचे साळवे म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरही भारताचा हिस्सा असून पाकिस्तानने त्या भागात अशांतता पसरविली आहे. काश्मीरचा कुठला भाग वादग्रस्त असेल तर तो केवळ पाकव्याप्त काश्मीरच आहे. भारताची राज्यघटनाच नव्हे तर काश्मीरची राज्यघटनाही काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हणते, असे उद्गार साळवे यांनी काढले आहेत.

काही निर्णय त्वरित घेणे आवश्यक

कलम 370 हद्दपार करण्याची बाब दीर्घकाळापासून मांडत होतो. काही ठिकाणी तुम्हाला अचानक निर्णय घ्यावे लागतात. कलम 370 हटविण्याकरता सरकारने अवलंबिलेली प्रक्रिया अत्यंत योग्य होती. हे कलम हटविण्यासाठी केवळ हीच पद्धत होती. कलम 370 हद्दपार करण्यापूर्वी त्याबद्दल चर्चा घडवून आणली जाणे गरजेचे होते असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. पण हा प्रकार मूर्खपणाचा ठरला असता, या निर्णयाचा उल्लेख झाल्यावर गोंधळ होत टीकेचा भडिमार सुरू झाला असता. भारताने याप्रकरणी अत्यंत योग्य पाऊल उचलल्याचे विधान साळवे यांनी केले आहे.

काहीही चुकीचे नाही

कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱया याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. या निर्णयात काहीही चुकीचे घडले असल्यास न्यायालय स्वतःचा निर्णय देईल. पण माझ्यामते या निर्णयात काहीच चुकीचे नाही. सरकारच्या पावलामुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरल्याचे जाणवत असल्याचे साळवे म्हणाले.

Related posts: