|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » बाजवा सक्रीय, इम्रान अडचणीत

बाजवा सक्रीय, इम्रान अडचणीत 

वृत्तसंस्था /इस्लामाबाद :

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे रहाटगाडे चालविण्यास आता तेथील सैन्यच महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी बुडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला वेग देण्याच्या उपायांवरून पाकच्या दिग्गज उद्योजकांची भेट घेतली आहे. देशाची आर्थिक राजधानी कराची आणि रावळपिंडी येथील सैन्य कार्यालयांमध्ये उद्योजकांसोबत तीन उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत.

सत्तांतर घडवून आणण्यात तरबेज असणाऱया ट्रिपल वन या सैन्यतुकडीच्या अधिकाऱयांची रजा रद्द करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा सैन्य राजवट लागू होण्याची शक्यता वाढली आहे.

अर्थव्यवस्थेवर घोंगावणाऱया संकटाला रोखण्यासाठी बाजवा यांनी चर्चा केली आहे. या चर्चेत गुंतवणूक वाढविण्याच्या उपायांवर विचारविनिमय झाला आहे.

पाक सैन्यावरही परिणाम

आर्थिक संकटाचा प्रभाव पाक सैन्यावरही दिसून येतोय. मागील एक दशकात पहिल्यांदाच संरक्षण अंदाजपत्रक गोठविण्यात आले आहे. पाकिस्तानी सैनिक अफगाणिस्तान आणि भारताच्या सीमेवर तैनात असताना ही स्थिती उद्भवली आहे.

बाजवा यांच्या भूमिकेचे उद्योजक आणि आर्थिक विश्लेषक स्वागत करत आहेत. पंतप्रधान इम्रान यांच्याकडे सैन्याच्या तुलनेत खूपच तोकडा अनुभव असल्याचे त्यांचे मानणे आहे. पाकिस्तानी लोकशाहीच्या दृष्टीकोनातून सैन्याच्या वाढत्या भूमिकेचा कुठला अर्थ असेल आणि कमकुवत असलेल्या नागरी संस्थांचे भविष्य काय असेल हे प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत.

विकासदर खालावतोय

चालू आर्थिक वर्षात पाकच्या आर्थिक विकासाचा अनुमानित दर 2.4 टक्के आहे. हा आकडा मागील एक दशकाचा नीचांकी आहे. राजकोषीय तूट वाढल्याने पाकने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 6 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते. जूनमध्ये समाप्त आर्थिक वर्षात पाकची अर्थसंकल्पीय तूट 8.9 टक्क्यांवर पोहोचली आहे.

 

 

Related posts: