|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पूरग्रस्त शेतकऱयांचे कर्ज माफ करणार

पूरग्रस्त शेतकऱयांचे कर्ज माफ करणार 

वार्ताहर/ अथणी

अथणी, कागवाड, रायबाग, चिकोडी, निपाणी तालुक्यात आलेल्या महापुरात  बुडून गरिबांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना घरे बांधून देण्यात येणार असून, पूर्ण पडलेल्या घरांना 5 लाख रुपयांचे सरकार अनुदान देत आहे.  पूरग्रस्त भागातील शेतकऱयांचे कर्जमाफ करण्यास सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले.

दरुर (ता. अथणी) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना धनादेश देऊन ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार पी. राजीव, दुर्योधन ऐहोळे, महांतेश दोडगौडर, महादेवाप्पा यादवाड, श्रीमंत पाटील, अजित चौगले, आर. एम. पाटील, ईश्वर कुंभार उपस्थित होते.

येडियुराप्पा पुढे म्हणाले, महापुरात नुकसान झालेल्या पिकांना महाराष्ट्र सरकारने ज्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली आहे. त्याप्रमाणे बेळगाव जिल्हय़ातील शेतकऱयांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्त भागात 1525 घरे पूर्ण जमीनदोस्त झाली आहे. पूरग्रस्तांच्या निवासाची सोय करण्यास सरकार कटिबद्ध आहे. महापुरात बुडीत झालेल्या गावात बहुग्राम पाणी योजना बंद झाली आहे. काही योजना अर्धवट असून त्यासाठी तातडीने 89 कोटींचा निधी मंजूर करण्यात येईल. सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे. आणखीन निधीसाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी एक शिष्टमंडळ जाणार आहे, असे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी, जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र, तहसीलदार एम. एन. बळीगार, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी उपस्थित होते. 

कडक पोलीस बंदोबस्त

मुख्यमंत्री येडियुराप्पा येणार असल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिसरातील दुकाने बंद केली होती. वार्तांकनासाठी आलेल्या विलास के. यांचे यावेळी 10 हजार रुपये चोरटय़ांनी लांबविले. या कार्यक्रमास आमदार उमेश कत्ती, माजी आमदार राजू कागे यांच्यासह भाजपचे बरेच नेते अनुपस्थित होते.

Related posts: