|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महापुरामुळे 11,193 कोटीचे नुकसान

महापुरामुळे 11,193 कोटीचे नुकसान 

प्रतिनिधी/ बेळगाव

महापुरामुळे संपूर्ण जिह्यालाच मोठा फटका बसला. एकूण 872 गावांना या महापुराचा फटका बसला असून 11 हजार 193 कोटी 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. असा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. पिकांबरोबर घरांची पडझड आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. आतापर्यंत 867 कोटी रुपये वितरीत केल्याची माहिती देखील देण्यात आली.

महापुरामुळे जिह्यातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या महापुरामध्ये 69 हजार 381 घरे कोसळली तर 32 जण दगावले. 761 जनावरे मृत्यूमुखी पडली. तसेच 2 लाख 21 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळाली तरी अद्याप केंद्राकडून मात्र एक पैसाही मिळालेला नाही. यामुळे पूरग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

जिह्यातील जी घरे बेघर झाली होती. त्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे वितरण केले आहे. एकूण 11 लाख 2 हजार 443 कुटुंबांना ही मदत दिली आहे. पावसामुळे अनेकांचा संसारच वाहून गेला होता. त्यामुळे त्या कुटुंबांना आहार कीट देण्यात आले. एकूण 10 लाख 8 हजार 268 कुटुंबांना आहार कीट देण्यात आली. आतापर्यंत एकूण 57 हजार 432 जणांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामधील 26 हजार 77 जणांना नुकसान भरपाई दिली आहे. एकूण 84 कोटी 39 लाख रुपये ही मदत केली आहे..

तात्पुरते शेड उभारणीसाठी 1 हजार 160 जणांना आर्थिक मदत केली होती. तसेच अनेकजण भाडोत्री घरांमध्ये राहत होते. अशा भाडोत्री राहणाऱया 2 हजार 551 कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार प्रमाणे भाडे दिले आहे. एकूण 1 कोटी 27 लाख 55 हजार रक्कम त्यांना वितरित केल्याचे सांगण्यात आले.

मयत झालेल्या 32 व्यक्तींच्या कुटुंबांपैकी 28 कुटुंबांना आर्थिक मदत केली आहे. एकूण 1 कोटी 40 लाख रुपये मदत केली आहे. 761 जनावरे दगावली होती. त्यांना 71 लाख रुपये वितरित केले आहेत. अधिकाधिक सर्व्हे करून रक्कम वितरित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. एकूण 2 हजार 149 कोटी 54 लाख नुकसान झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. 3 हजार 229 कोटी 8 लाख रुपयांचे पीक नुकसान झाले आहे. तसेच 2 हजार 808 कोटी रुपयांचे खासगी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. एकूणच 11 हजार 193 कोटींचे नुकसान झाले असून केंद्र सरकारकडून मात्र अद्याप म्हणावी, तशी मदत मिळाली नाही.

सध्या सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येत असली तरी सर्वसामान्य जनतेमध्ये मात्र अजूनही नाराजी पसरली आहे. काही जणांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे तक्रारी करत आहेत. तर काही जणांची कागदपत्रेच नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत..

Related posts: