|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हयात 40 उमेदवारांचे अर्ज वैध

जिल्हयात 40 उमेदवारांचे अर्ज वैध 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ातील पाच मतदारसंघात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली. यात 6 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून एकूण 40 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. चिपळुणमधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्याने तेथे आघाडी रिंगणाबाहेर झाली आहे. दापोलीत सर्वाधिक 14 तर चिपळुणमध्ये सर्वात कमी म्हणजे 4 उमेदवार रिंगणात आहेत. यातील किती जण अखेरपर्यंत मैदानात  राहणार हे आता 7 ऑक्टोबर रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

  चिपळूण मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्लचंद्र पवार यांचा छाननीत अवैध ठरल्याने आघाडी रिंगणाबाहेर गेली आहे. त्यामुळे आता चारच उमेदवार रिंगणात उरले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीचे सदानंद चव्हाण, कांग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे शेखर निकम, बसपाचे सचिन मोहिते व भाजप जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला आहे. पवार यांनी एकच प्रस्तावक दिल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला आहे.

दापोलीत सर्वाधिक उमेदवार

 दापोली मतदारसंघात सायली कदम यांनी राष्ट्रवादीकडून भरलेला एकमेव अर्ज  अवैध ठरल्याने एकूण 14 उमेदवार रिंगणात राहीले आहेत. यामध्ये सेनेचे योगेश कदम व राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मात्र यावेळी या मतदारसंघात ‘रायगड पॅटर्न’ राबवण्यात आलेल्या एकूण 4 संजय कदम व 2 योगेश कदम रिंगणात आहेत. त्याचा फटका व फायदा कोणाला मिळतो याकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी भाजपने बंडाचे निशाण रोवले आहे.  केदार साठे व सुवर्णा पाटील यांचे भाजपकडून भरलेले अर्ज अवैध ठरले असले तरी अपक्ष अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.

गुहागरात 2 अर्ज अवैध

   गुहागर मतदारसंघात 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवल्याने आता एकूण 6 उमेदवार रिंगणात राहीले आहेत. या मतदारसंघात शिवसेना उमेवार भास्कर जाधव  व राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. अपक्ष उमेदवार निलेश चव्हाण यांनी शपथपत्र वेळेत सादर न केल्याने तर राष्ट्रवादीच्या सुरेश खापले यांनी ए. बी. फॉर्म न जोडल्याने या दोघांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. भाजपचे बंडखोर रामदास राणे यांचा पक्षाच्यावतीने भरलेला अर्ज अवैध ठरला असला तरी अपक्ष म्हणून ते रिंगणात कायम आहेत. शिवसेनेचे भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर, अपक्ष रामदास राणे, मनसेचे गणेश कदम, वंचितचे विकास जाधव, बसपाचे उमेश पवार निवडणूक रिंगणात आहेत.    

                     रत्नागिरीत 6 उमेदवार

   रत्नागिरी मतदार संघात 7 उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार अण्णासाहेब कारभारी निकम यांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याने एकूण 6 उमेदवार रिंगणात राहील आहेत. या मतदारसंघात सेना भाजप महायुतीचे उमेदवार आमदार उदय सामंत व काँग्रेस-राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांच्यात येथे प्रमुख लढत होणार असून  बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदीप उर्फ बाळा कचरे, बसपाचे राजेश जाधव, कुणबी-बहुजन संघटनेचे संदीप गावडे, वंचित आघाडीचे कॅ. दामोदर कांबळे यांचे अर्ज वैध ठरले आहेत.  

  राजापुरात 10 अर्ज वैध

 राजापुर मतदासंघातून अपक्ष उमेदवार नीलेश बबन सुतार यांचा अर्ज अवैध  ठरल्याने आता 10 उमेदवार रिंगणात उरले आहेत. सुतार यांनी सादर केलेल्या अर्जासमवेत बॉण्डपेपरवर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे राजन साळवी, कॉंग्रेस आघाडीचे अविनाश लाड, मनसेचे अविनाश सौंदळकर, हिंदु महासभेचे विलास खानविलकर, बसपाचे महेंद्र धर्मा पवार, कुणबी बहुजन स्वराज्य पक्षाचे संदीप ठुकरुल अपक्ष मंदार राणे, संतोष गांगण, प्रसाद पाटोळे, राज पाध्ये यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Related posts: