|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महेश कोठेंचा शिवसेनेकडून भरण्यात आलेला अर्ज फेटाळला

महेश कोठेंचा शिवसेनेकडून भरण्यात आलेला अर्ज फेटाळला 

प्रतिनिधी/ सोलापूर

विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये शहर उत्तर, मध्य आणि दक्षिणमधून 69 अर्ज वैध ठरली तर 12 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. दरम्यान, शहरमध्यमधून महेश कोठे यांनी शिवसेनेकडून भरलेला अर्ज ए.बी. फॉर्म नसल्यामुळे अवैध ठरवण्यात आला तर अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मंजूर करण्यात आला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख यांनी पूरक म्हणून भरलेला अर्ज अवैध ठरवण्यात आला.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्तर तहसिल, दक्षिण सोलापूर यासह जिह्यातील तहसील कार्यालयात अर्ज छाननी करण्यात आली. यामध्ये शहर मध्य, दक्षिण, उत्तर मधील 12 अर्ज अवैध ठरवण्यात आले. शहरमध्यमधून 33 अर्जापैकी  दिलीप माने- शिवेसना, जुबेर बागवान-राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार प्रणिती शिंदे- काँग्रेस, नरसय्या आडम-माकप, फारूख शाब्दी-एमआयएम, इम्तीयाज पिरजादे- वंचित बहुजन आघाडी यांच्यासह 27 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर पृथ्वीराज माने-अपक्ष, अशोक गायकवाड-बहुजन मुक्ती पार्टी, इरफान पटेल-इंडियन मुस्लिम लीग, मल्लारी पाटोळे- समता जनता पार्टी, वंदना उघडे-अपक्ष, देविदास दुपागुडे- अपक्ष यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले.

  शहर उत्तर मधून 19 अर्जापैकी विजयकुमार देशमुख- भाजप, मनोहर सपाटे- राष्ट्रवादी काँग्रेस, आनंद चंदनशिवे- वंचित बहुजन आघाडी, अतिष बनसोडे- एमआयएम यांच्यासह 16 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपाकडून दोन अर्ज केले होते यापैकी एक मंजूर तर एक नामंजूर तर किरण देशमुख यांनी पूरक अर्ज भरल्यामुळे तो अर्ज नामंजूर करण्यात आला. मनोहर सपाटे यांनी अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन अर्ज भरले होते यापैकी अपक्ष म्हणून अर्ज अवैध ठरवण्यात आला असे एकूण 3 अर्ज अवैध ठरवण्यात आले. दक्षिण सोलापूरमधून सुभाष देशमुख-भाजप, बाबा मिस्त्राr-काँग्रेस, अमित अजनाळकर- एमआयएम यांच्यासह 27 अर्ज वैध ठरले तर नागनाथ धर्मशाळे- अपक्ष, काँग्रेसचे प्रशांत कांबळे यांनी ए.बी. फॉर्म न जोडल्यामुळे, चंद्रशेखर गायगवळी यांच्यासह 3 अर्ज अवैध ठरवण्यात आले. 

     सुभाष देशमुखांच्या अर्जावर हरकत

दक्षिण सोलापूर मतदारसंघाची अर्जाची छाननी मध्ये भाजपचे सुभाष देशमुख यांच्या अर्जावर अप्पराव कोरे हरकत घेत म्हणाले होते की, होटगी रोडवरील देशमुख यांचा बंगला अग्नीशामक दलाच्या जागेवर अनधिकृतपणे बांधला असून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे सुभाष देशमुख यांचा अर्ज फेटाळावा. मात्र युक्तीवाद ऐकल्यानंतर भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला.