|Sunday, December 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मग मी होईन तिज आधीन

मग मी होईन तिज आधीन 

सुदेव ब्राह्मण रुक्मिणीचे पत्र घेऊन द्वारकेला गेला. इकडे कृष्णाच्या विरहाने रुक्मिणी व्याकुळ झाली. ती परमसुंदरी कृष्णाच्या आगमनाची वाट पाहत होती. रुक्मिणी मनोमन म्हणत होती-अजून कृष्ण कसा येत नाही? कृष्णाला विषयाची आवड नाही आणि मी त्याला पत्र लिहिले की, तुझी मी भार्या होईन. त्यामुळे मी कृष्णाची नावडती झाली काय? त्यांना वाटले असेल-काय ही ढालगज मुलगी आहे! बळेच माझ्या घरात घुसून मला वश करू पाहत आहे.

मग मी होईन तिज आधीन । जिवें जिता करील दीन ।

अमना आणूनियां मन । नाचवील निजछंदें ।

कार्याकारण समस्त । तेचि करील निश्चित ।

सुचित्त आणि दुश्चित्त । आंदण्या दासी आणील ।

तिचा विकल्पया बंधु । आंदणा येईल कामक्रोधु ।

तिचा बोळवा गर्वमदु । घरभेदू वाटेल ।

माझेनि आंगें थोरावेल । मज ते नांवरूप करील ।

विषयगोडी वाढवील । मुद्दल वेंचील निजज्ञान ।

होईल निर्लज्जा नि:शंक । मज देखें न शकती लोक ।

ऐसें जाणोनि निष्टंक । न योचि देख श्रीकृष्ण ।

कृष्ण असा विचार करतील-अशा धीट मुलीला मी वरले तर ती मला अमनाला मन आणून दीन करेल. आपल्या तालावर नाचवेल. मी काय करावे, काय करू नये हे तीच ठरवू लागेल. चांगले मन आणि वाईट मन या दासी ती आंदण म्हणून आणेल. तिचा विकल्प हाच भाऊ आहे. तिची, या नवरीची बोळवण करायला म्हणून आलेले काम, क्रोध, गर्व, मद हे माझ्या घरात शिरून घरात भेद, भांडणे निर्माण करतील. माझा मोठेपणा वाढावा म्हणून मला निर्गुणाला ही सगुण करील, मला नाव रुप प्राप्त होईल. मला विषय गोड वाटू लागतील आणि आत्मज्ञान मी विसरून जाईन. ही निश्चितच निर्लज्ज आहे. हिच्या नादी न लागणे हेच उत्तम. मला लोक पाहू शकत नाहीत हेच बरे आहे, असे म्हणून तो श्रीकृष्ण येणारच नाही. असे रुक्मिणीला मनोमन वाटते.

लिखितीं चुकी पडली मोठी । पावेन शतजन्मापाठीं ।

हें देखोनि जगजेठी । उठाउठी न पवेची ।

मज नाहीं वैराग्य कडाडी । भेटी न मागेचि रोकडी ।

माझिया मुखरसाची गोडी । प्रतिबंधक मज झाली ।

शिवादि चरणरज वांछित । त्या मज पाठविल लिखित ।

आंगे उडी न घालीच येथ । आळसयुक्त भीमकी ।

लिखितासाठीं जरी मी सांपडे । तरी कां साधक शिणती गाढे ।

भीमकीं आहे केवळ वेडें । येणें न घडे मज तेथें ।

रुक्मिणी पुढे विचार करते-अरेरे! पत्रात मी लिहिलेले शब्द-शंभर जन्म घेईन व तुला प्राप्त केल्यावाचून राहणार नाही, मला बाधक ठरले काय? म्हणजे शंभर जन्मानंतर मी येईन, असे कृष्ण म्हणतील.

Ad.  देवदत्त परुळेकर

Related posts: