|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » मधुरा वेलणकर झाली लेखिका

मधुरा वेलणकर झाली लेखिका 

लेखकाने स्वत: पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा कल्पिलेलं असतं. ते जवळजवळ तसंच उभं करण्याची लेखकाची ताकद किती असू शकते हे रारंगढांग या प्रभाकर पेंढारकरांच्या पुस्तकातून मला कळलं, असं म्हणणारी आणि सुरुवातीला वाचनाचीही फारशी आवड नसलेली मधुरा वेलणकर ही अभिनेत्री झी दिशाचे विजय कुवळेकर यांच्या आग्रहाखातर स्वत:चे अनुभव मधुरव या सदरातून मांडायला लागली आणि ती या लेखनप्रपंचात इतकी रमून गेली की, या सदरातल्या आणि इतर नियतकालिकांतल्या लेखांचं पुस्तकात रुपांतर होण्याच्या दिशेचा प्रवास तिच्याही नकळत तिला सीमोल्लंघनाच्या वळणापर्यंत घेऊन आला.

चार राज्य पुरस्कारांची आणि इतर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली एक चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपल्याला परिचित असलेल्या आणि नाटय़-चित्रपटöअभिनय शिबिरöकार्यशाळा अशा नानाविध माध्यमांतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात घोडदौड करणाऱया मधुराने अगदी सहजच लेखनक्षेत्रातही पाऊल टाकलं आणि आता तिच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचं ‘मधुरव’चं प्रकाशन तिच्या वाढदिवशीच मंगळवारी 8 ऑक्टोबरला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या शुभहस्ते यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा पश्चिम इथे रात्री 8 वाजता होणार आहे.

रसिक आंतरभारती या पुण्याच्या नामवंत प्रकाशनाकडून प्रकाशित केल्या जाणाऱया या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ाची सगळी सूत्रं लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या हातात असून, अनेक कलाकार या सोहळय़ाचे साक्षीदार असणार आहेत. चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे आणि माझ्या नवऱयाची बायको फेम अनिता दाते या दोन अभिनेत्री मधुरव पुस्तकातल्या निवडक अंशांचं अभिवाचन याप्रसंगी करणार आहेत. तसेच मधुरा वेलणकर-साटम यांचे कुटुंबीय आणि चित्रपट-नाटय़ क्षेत्रातले अनेक दिग्गज कलाकार यांच्याशी गप्पांच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. प्रकाशनानंतर प्रकाशनाच्या ठिकाणी आणि त्यानंतर सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे आणि ऑनलाईन हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.