|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लढतींचे चित्र आज होणार स्पष्ट

लढतींचे चित्र आज होणार स्पष्ट 

बंडखोरी थोपविण्याचे महायुतीसमोर आव्हान

वार्ताहर / कणकवली:

विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत सोमवार 7 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत असल्याने दुपारनंतरच लढतींचे पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात एकूण 10 उमेदवार, कुडाळ – मालवणमध्ये नऊ तर कणकवली मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तिन्ही मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश येणार की महायुती तुटणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सावंतवाडी मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांनीही केसरकर यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सावंतवाडी मतदारसंघ हा महायुतीच्या वाटय़ाला आल्याने येथे केसरकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र तेली, साळगावकर व मनसेचे प्रकाश रेडकर येथे रिंगणात उभे ठाकल्याने चौरंगी लढतीची शक्यता आहे. या मतदारसंघात बसपातर्फे सुधाकर माणगावकर, सत्यवान जाधव, समाधान बांदवलकर, राजू कदम, अजिंक्य गावडे, यशवंत पेडणेकर हेदेखील रिंगणात आहेत.

कुडाळमध्ये काय होणार?

कुडाळ-मालवण मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे वैभव नाईक यांनी अपक्ष व पक्षातर्फे असे दोन उमेदवारी दाखल केले असून त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केलेल्या अपक्ष उमेदवार दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतींमध्ये अचानक वेगळे वळण घेत आता नाईक यांच्या विरोधात येथे अपक्ष म्हणून रणजीत देसाई व अतुल काळसेकर हे प्रमुख विरोधक म्हणून रिंगणात आहेत. मात्र, यातील देसाई किंवा काळसेकर यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नाईक यांची लढत कोणासोबत होणार, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून यात अपक्ष म्हणून सिद्धेश पाटकर, विष्णू मोंडकर, बसपाचे रवींद्र कसालकर, राष्ट्रीय काँग्रेसचे चेतन मोंडकर, मनसेकडून धीरज परब यांचा समावेश आहे.

कणकवलीत महायुतीत ठिणागी

कणकवली मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार म्हणून नीतेश राणे व शिवसेनेकडून आयत्यावेळी एबी फॉर्म मिळविलेले सतीश सावंत आणि अपक्ष संदेश पारकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपचे नेते संदेश पारकर माघार घेत सतीश सावंत यांना पाठिंबा देणार की तिरंगी लढत होणार, याचीही उत्सुकता आहे. या मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात आहेत. यात मनसेकडून राजन दाभोलकर, राष्ट्रीय काँग्रेसकडून सुशिल राणे, वंचित बहुजन आघाडीकडून ऍड. मनाली वंजारे, बहुजन समाज पार्टीकडून विजय साळसकर, बहुजन मुक्ती पार्टीकडून वसंतराव भोसले यांचा समावेश आहे. जिह्यातील तीनही मतदारसंघातील लढतीत कणकवली मतदारसंघात होणारी लढत लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.