|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आरोंदा चोरीप्रकरणी संशयिताला अटक

आरोंदा चोरीप्रकरणी संशयिताला अटक 

पाच महिन्यापूर्वी महिलेच्या गळय़ातील दागिने खेचून केले होते पलायन

सावंतवाडी:

आरोंदा येथे पाच महिन्यापूर्वी सेवानिवृत्त शिक्षिकेच्या गळय़ातील सोन्याचे दागिने खेचून पलायन केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी राधानगरी-घामोड येथील उत्तम राजाराम बारड (27) याला अटक केली. त्याला रविवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 17 मे 2019 रोजी दुपारी आरोंदा येथील सेवानिवृत्त शिक्षिका निलांगी नारायण राणे या एकटय़ा घरी असल्याची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी चोरटय़ांनी पिण्यासाठी पाणी आणण्यास सांगितले. पाणी आणून देताच चोरटय़ांनी तिच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून मुहूर्त मणी चोरी करून ते दोघे पळून गेले होते. याबाबत वृद्ध महिलेने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यानी तपास सुरू ठेवला होता. याच दिवशी वैभववाडी-कोकिसरे गावात अशाच प्रकारचा चोरीची घटना घडली होती. कोल्हापूर शाहूपूरी हद्दीत चोरीप्रकरणी तेथील पोलिसांनी आरोपी उत्तम बारड याला अटक केली होती. त्यावेळी तपासात आरोपीने वैभववाडी-कोकिसरे येथे चोरी केल्याचे उघड झाले होते. त्यानुसार वैभववाडी पोलिसानी आरोपी उत्तम बारड याला ताब्यात घेत अटक केली होती. त्याने चोरीतील सोन्याचा ऐवज गोव्यातील सोनाराला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला होता. सदरचा आरोपी वैभववाडी पोलिसांच्या तपासानंतर कोल्हापूर येथील कारागृहात होता. वैभववाडी व सावंतवाडी-आरोंदा येथील या दोन्ही चोरीच्या घटना एकसारख्या असल्याने आरोंदा येथील चोरीत या आरोपीसह त्याच्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, पोलीस कर्मचारी वसंत पारधी, सुभाष ढाले यानी कोल्हापूर येथून आरोपी उत्तम बारड याला चोरीच्या गुन्हय़ाप्रकरणी शनिवारी ताब्यात घेत अटक केली. आरोंदा येथील सेवानिवृत्त शिक्षिकेच्या गळय़ातील सोन्याचा ऐवज लंपास केल्याप्रकरणातील मुद्देमाल कुठे विकला?, कुठे ठेवला?, अन्य साथीदार कोण आहेत? आदी तपास करण्यासाठी न्यायालयात पोलीस कोठडी मागण्यात आली. रविवारी सावंतवाडी न्यायालयाने संशयित आरोपीला 7 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी अमित गोते यानी दिली. संशयिताला तपासासाठी रविवारी आरोंदा येथे घटनास्थळी नेण्यात आले.