|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लोकप्रतिनिधीची व्याख्या समजून देण्यासाठी दिला दणका

लोकप्रतिनिधीची व्याख्या समजून देण्यासाठी दिला दणका 

वैभव नाईक यांचा दत्ता सामंत यांना टोला : कट्टा येथे शिवसेना लोकप्रतिनिधी मेळावा

प्रतिनिधी / मालवण:

आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱयांना लोकप्रतिनिधी पदाची व्याख्या समजून सांगण्यासाठीच उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली. ज्याला लोकप्रतिनिधी होण्याचा अर्ज भरता येत नसेल आणि शासनाला खोटी माहिती देत असेल, तर तो लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करणार? त्यामुळेच आपण दणका दिला, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी कट्टा येथे आयोजित शिवसेना लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यात लगावला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेविरोधात सगळे असेच चित्र उभे राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली निवडणूक आहे, असे समजून कामाला लागावे. यावेळी मताधिक्क्याने विजय संपादन करून विरोधकांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असेही नाईक म्हणाले.

कट्टा येथील माडय़े सभागृहात रविवारी शिवसेना लोकप्रतिनिधींचा मेळावा सायंकाळी झाला. यावेळी नाईक मार्गदर्शन करत होते. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, महिला आघाडीप्रमुख जान्हवी सावंत, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, प्रसाद मोरजकर, बंडू सावंत, पं. स. सदस्य कमलाकर गावडे, छोटू ठाकुर, बंडू चव्हाण, युवा उपजिल्हाप्रमुख सुशिल चिंदरकर, पंकज वर्दम, सरपंच समिती अध्यक्ष नंदू गावडे, नगरसेवक मंदार केणी, सचिन काळप, सुशांत नाईक, दीपा शिंदे, मालवण युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, विभागप्रमुख प्रवीण लुडबे, भाऊ चव्हाण, विजय पालव, पराग खोत, दीपक राऊत, उदय दुखंडे, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, दर्शन म्हाडगूत, महिला उपजिल्हाप्रमुख देवयानी मसुरकर, प्रज्ञा चव्हाण, सुगंधा गावडे, खोत आदी उपस्थित होते.

विकासकामे लोकांपर्यंत न्या!

गेल्या पाच वर्षात गावागावात मंजूर झालेली आणि पूर्ण झालेली विकासकामे हे मतदारांपर्यंत नेऊन शिवसेनेचे कार्य सर्वांना सांगण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. गावागावातील कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या गावातून जास्तीत जास्त मतदान शिवसेनेला होण्यासाठी नियोजन केले पाहिजे. विकासकामे ज्या पद्धतीने झाली आहेत, त्याची माहिती लोकांना होण्यासाठी निवडणुकीचा कालावधी महत्वाचा असतो. यात आपण विधानसभेची तयारी करताना पुन्हा ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठीही आखणी केली पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या कार्यावरच मताधिक्य असणार आहे. त्यामुळे सर्वांनी दक्षतेने काम करावे, असे आवाहन नाईक यांनी केले.

जिल्हा परिषद शिवसेना घेणार ताब्यात!

शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमी उमेदवारी दिली आहे. लोकसभेतील विजयानंतर आता जिल्हय़ातील तिन्ही विधानसभेच्या जागांवर शिवसेना विजयी झाल्यानंतर भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती ही शिवसेनेच्याच ताब्यात येणार आहे. जिल्हा बँकेवरही शिवसेना सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून काम केले पाहिजे. जिल्हा परिषदेवर आपली सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्गात भगवे वादळ निर्माण होणार आहे. याचे सर्व श्रेय शिवसैनिकांना जाणार आहे, असेही नाईक म्हणाले.