|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वाटद एमआयडीसी हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांची वज्रमुठ!

वाटद एमआयडीसी हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांची वज्रमुठ! 

बाधित सहा गावच्या ग्रामस्थांनी घेतली शपथ

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्रस्तावित एमआयडीसीविरोधात स्थानिकांनी पुन्हा एकदा ‘एल्गार’ केल़ा शासन आम्हांला जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासन देत आह़े आम्हाला मोबदला नको आणि एमआयडीसी तर नकोच नको, असा निर्णय घेत वाटद एमआयडीसीला हद्दपार करण्यासाठी शेवटपर्यंत लढू, अशी एकत्रित शपथ येथील ग्रामस्थांनी घेतली. वाटद एमआयडीसीविरोधात लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 

   वाटद एमआयडीसीविरोधात रविवारी वाटद खंडाळा येथे एमआयडीसी क्षेत्रातील बाधित सहा गावच्या ग्रामस्थांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेला मुबंईकर चाकरमानी आणि स्थानिक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी एमआयडीविरोधात उत्स्फूर्त मुद्दे मांडले. कोणतीही जनसुनावणी न घेता एमआयडीसीचा प्रकल्प आपल्यावर लादण्यात आला आहे. पूर्वजांनी पोटाला चिमटा घेऊन, शेतात राबून ठेवलेल्या जमिनी अशा प्रकारे दलालांच्या हाती जाऊ द्यायच्या नाहीत. मुबंईपासून कोकणच्या पट्टय़ात अनेक एमआयडीसी उभ्या राहिल्या. त्यातील अनेक उद्योग आज बंद झाले आहेत. रत्नागिरीतील मिरजोळे येथील एमआयडीसी साडेचारशे एकर जागेत आहे. येथीलही बहुतांश जागा रिकामी पडलीय, तिथेही कारखाने चालत नाहीत. तरीही आपल्या गावांतील जमीन यांना हवी आहे. आजची वेळीही आपल्या जमिनीची राखण करण्याची वेळ आहे. ज्या जमिनीने सर्वसामान्य शेतकऱयांना घडवले, राजकीय पुढारी दिले, उद्योजक दिले. तीच जमीन आता राखण करण्याची गरज बनली आहे. वाटद एमआयडीसीला 100 टक्के विरोध असून या विरोधात सह्यांची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. एमआयडीविरोधात गांधी मार्गाने लढा सुरू ठेवण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. एमआयडीसीपेक्षा प्रशासनाने इथल्या शेतकऱयांना 500 एकर जमीन द्यावी. त्या जागेत शेतीच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्न घेऊन आम्ही दाखवतो. पण आमच्या पोटावर प्रशासनाने नांगर फिरवू नये, असे भावनिक आवाहनही उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आले. 

  एमआयडीसीच्या प्रदुषणामुळे त्वचा, श्वसन तसेच कर्करोगासारखे दुर्धर आजार जडलेले रुग्ण लोटे व नागोठणे एमआयडीसी परिसरात पहायला मिळत आहेत. आपल्याकडील जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असून आपल्याला भविष्यात विविध प्रकारचे आजार भेट दिली जाणार असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. हा अन्याय शेतकरी सहन करणार का, प्रदुषणाचा राक्षस आज आपल्या माथी मारला गेलाय. स्वत:ला मिळालेली जागा कारखान्यानंतर अन्य कारणांसाठी वापरून आता एसआयडीसीच्या रूपाने आपले गाव गिळायला हा प्रदुषणरुपी राक्षस निघाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला शेवटपर्यंत विरोधाचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. सहा गावांच्या एकत्रित बैठकीला दीपक कुर्टे, सदा वीर, प्रकाश पवार, प्रमोद तांबटकर, प्रकाश धोपट, महेश मोघे, सुयोग आडाव, प्रसाद रहाटे, संतोष बारगुडे यांच्यासह सहा गावातून शेकडो ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  

              न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार

वाटद येथील प्रस्तावित एमआयडीसीविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढा देण्यासाठी ग्रामस्थांनी वज्रमुठ केल़ी तसेच या प्रकल्पाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. हायकोर्टात लागणार सर्व खर्च करण्याची जबाबदारी वाटद गावचे अनंत किंजळे यांनी उचलली आहे.

Related posts: