|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विधानसभेचे मैदान आज स्पष्ट होणार

विधानसभेचे मैदान आज स्पष्ट होणार 

बंडोबांना थंड करण्याच्या हालचाली गतिमान : 111 उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र

प्रतिनिधी/ सांगली

 विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या छाननीमध्ये वाचलेल्या 111 इच्छूकांसाठी आज शेवटचा दिवस आहे. सोमवारी माघारीचा अंतिम दिवस असल्याने बंडोबांना थंड करण्यासाठी रविवारी सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. भाजपा-सेना युतीसह काही ठिकाणी आघाडीतही बंडाचे निशान फडकावल्याने त्यांना थांबविण्यात नेत्यांना किती यश येते यावरच विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

 शनिवारी झालेल्या छाननीमध्ये 14 जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आठ मतदार संघात 111 उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. माघारीचा सोमवारी अंतिम दिवस असल्याने नेत्यांनी माघारीसाठी मनधरणी सुरू केली आहे. पण, रविवारी उशीरापर्यंत प्रमुख उमेदवारंचे बंड थांबविण्यात यश आले नसल्याचे समजते.

  जिह्यातील आठ विधानसभा मतदार संघासाठी 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. या कालावधीत 125 उमेदवारांचे 165 अर्ज दाखल झाले होते. शनिवारी त्या-त्या विधानसभा मतदारसंघात छाननी करण्यात आली.    निवडणुकीसाठी 111 उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. अपात्र ठरलेल्या अर्जामध्ये मिरज मतदारसंघांमध्ये वीस अर्ज दाखल झाले होते. पैकी सतरा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.  सांगली मतदारसंघात 15 उमेदवारी अर्ज होते, पैकी 14 पात्र ठरले,

 इस्लामपूर विधानसभा मतदार संघात 12 उमेदवारी अर्जापैकी 11 जणांचे अर्ज वैध ठरले. शिराळा मतदारसंघात तेरा उमेदवारांपैकी अकरा अर्ज वैध ठरले. पलूस-कडेगाव मतदारसंघातील वीस अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 14 जणांचे वैध ठरले असून सहा उमेदवारी अर्ज अवैध ठरले. खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघ अठरा उमेदवारी अर्जापैकी सर्वच अर्ज वैध  ठरले. तासगाव-कवठेमंकाळ मतदारसंघ दहा उमेदवारी अर्जापैकी नऊ अर्ज वैध ठरले. तर जत विधानसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

बंडोबांना थंड करण्यासाठी फिल्डिंग

 जिह्यातील आठही मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. पक्षांतर्गत झालेली बंडखोरी थोपविण्याचे नेत्यांपुढे आव्हान आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सोमवारचा एकमेव दिवस आहे. या कालावधीत साम, दाम, दंड या मार्गांचा अवलंब करून उमेदवारी मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमधील इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांनी युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. शिराळा मध्ये भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या विरोधात महाडिक गटाचे सम्राट महाडिक यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विलासराव जगताप यांच्या विरोधात भाजप अंतर्गत विकास आघाडीच्या माध्यमातून डॉ. रवींद्र आरळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांगली मतदारसंघात भाजपाचे सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात भाजपामधील जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी डोंगरे यांनी अर्ज दाखल केला आहे. या दखलपात्र बंडखोरांना माघारीसाठी नेत्यांची धावाधाव सुरू झाली असून त्यांना थोपवण्यात कितपत यश मिळणार हे सोमवारी दुपारनंतर स्पष्ट होईल.