|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ज्वेलरी दुकान फोडून नऊ लाखाचा ऐवज लंपास

ज्वेलरी दुकान फोडून नऊ लाखाचा ऐवज लंपास 

जतेत चोरटय़ांचा डल्ला : तिजोरी हातगाडीवरून पळवली

प्रतिनिधी/ जत

शहरात मंगळवार पेठेत असणारे लक्ष्मी ज्वेलर्स शनिवारी रात्री अज्ञात चौघा जणांनी फोडून सुमारे पावणे नऊ लाखाचा ऐवज लंपास केला. यात दहा किलो चांदी व दीडशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चोरटय़ांनी दुकानातील अवजड लॉकर थेट दुकानातून उचलून आणत हातगाडय़ावरून नेले आहे. हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जतच्या मुख्य बाजार पेठेत तिप्पेहळ्ळी येथील राजाराम प्रल्हाद शिंदे यांचे लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी त्यांनी रात्री आपले दुकान बंद केले. शनिवारी दुकानाला सुट्टी असल्याने ते दुकानाकडे आले नव्हते. शनिवारी रात्री साडे आकरा वाजल्यापासून जत शहरात मोठा पाऊस सुरू झाला होता. वीजही गेली होती. मुसळधार पाऊस असल्याने रस्त्यावरही कोणी नव्हते. याचाच फायदा घेत रात्री चौघा जणांच्या टोळक्यांनी बाजारपेठेत मुख्य ठिकाणी असणारे लक्ष्मी ज्वेलर्सचे शटर कटावणीने तोडून काढले. आतमध्ये प्रवेश करून थेट सोने चांदीचे दागिने असणारे लोखंडी लॉकरच उचलून घेतले. हे लॉकर त्यांनी बाहेर आणून मार्केट यार्डापासून चोरून आणलेल्या हातगाडय़ावर ठेवून पळवून नेले.

दरम्यान, सकाळी या चोरीची माहिती दुकान मालकांना लागली. त्यांनी तातडीने जत पोलिसांनी याची माहीती घेतली. दुपारपर्यंत पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथक बोलावून तपास सुरू केला होता. त्यानंतर शहरातील गंधर्व नदीजवळ असण्णाऱया लोखंडी पुलाच्या खालच्या बाजूस ही तिजोरी पडली असल्याचे कांही नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने तिथे जावून पाहणी केली असता, चोरटय़ांनी लॉकरमधील मुद्देमाल लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे.

या लॉकरमध्ये दहा किलो चांदी व दीडशे ग्रॅम सोन्याचे दागिने होते. याची किंमत आठ  लाख 74 हजार पाचशे रूपये इतकी होते. तर बाजार पेठेतील कांही ठिकाणचे फुटेज चेक केल्यानंतर एका फुटेजमध्ये चौघे चोर तोंडाला बांधून हातगाडय़ावरून तिजोरी घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. पोलीस चोरटय़ांचा कसून तपास करीत आहेत.

जत शहराच्या बाजार पेठेत असे चोरीचे प्रकार सतत घडत आहेत. याबददल व्यापाऱयांनी अनेकवेळा पोलिसात निवेदन दिले हेते. त्यानंतर शनिवारच्या घटनेनंतर सराफ असोसिएशनने पोलिसांना निवेदन देत या चोरीचा छडा तातडीने लावावा, अशी मागणी केली आहे.