|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आर्ट्स सर्कलतर्फे ‘नादरंग’ पुस्तकाचे प्रकाशन

आर्ट्स सर्कलतर्फे ‘नादरंग’ पुस्तकाचे प्रकाशन 

प्रतिनिधी/ बेळगाव

दस्ताऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करण्याची पद्धतच आपण विस्तारली नसल्याने स्मरण रंजनावर आपला अधिक भर राहिला आहे. परंतु इतिहासासह वर्तमानाचा भेद घेण्याची गरज आहे. अचूक नोंदी नसल्या तर दस्ताऐवजीकरण होत नाही. आणि पुढील पिढीला कोणतेही संदर्भ उपलब्ध होत नाहीत. संदर्भ नसले तर पुढील पिढय़ांचे शिक्षणच एका अर्थाने खुंटते व त्याला काहीअंशी आपण जबाबदार ठरतो. हे लक्षात घ्यायला हवे, असे स्पष्ट मत राज्य मराठी विकास संस्था मुंबईचे अध्यक्ष गिरीश पतके यांनी व्यक्त केले.

राज्य मराठी विकास संस्थेच्या बृहन्महाराष्ट्र मंडळ अर्थसाहाय्य योजनेंतर्गत बेळगावच्या आर्ट्स सर्कलने ‘नादरंग’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवारी आयएमईआरच्या सभागृहात झाला. त्यावेळी पतके बोलत होते. व्यासपीठावर सर्कलच्या अध्यक्षा लता कित्तूर, नादरंगचे लेखक नंदन हेर्लेकर व मेधा मराठे तसेच प्रमुख पाहुणे व्यंगचित्रकार जगदीश कुंटे आदी उपस्थित होते.

गिरीश पतके म्हणाले, रंगमंचावरील नाटकाचे आपण वेडे आहोत. म्हणजेच जे नाटक समोर घडते त्याचाच आपण विचार करतो. त्या अनुषंगाने येणाऱया गोष्टींचा आपण विचार करत नाही. आपल्याकडे दस्ताऐवजीकरणाची पद्धतच नाही. आपण मौखिक परंपरा अनेकदा गौरवितो. एका अर्थाने ते आवश्यक असूही शकते. परंतु त्या परंपरेबरोबर काही प्रक्षिप्त गोष्टीही नकळतपणे स्वीकाराव्या लागतात. याचे भान आपण ठेवत नाही.

आपण खूप जुन्या गोष्टींचेच चाहते आहोत. स्मरण रंजनावर आपला भर आहे. परंतु ज्या इतिहासाचे दाखले आपण देतो त्याचे आजचे वास्तव काय हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाने आपण अचूक नोंदी ठेवत नाही. म्हणून दस्तऐवज तयार होत नाहीत. पुढील पिढीला संदर्भ मिळत नाहीत. त्यामुळे नवीन पिढीला नाटक आपलेसे वाटत नाही, असे सांगून कुमारगंधर्व यांना घराणे मान्य नव्हते. घराण्याचा वारसा चालवला तर नक्कल होते आणि प्रयोग थांबतात, असे ते मानत. हे आता आपण लक्षात घ्यायला हवे, अशी अपेक्षाही पतके यांनी व्यक्त केली.

या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. कोणी तरी दस्ताऐवजीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुढील पिढय़ांना संदर्भ प्राप्त होतील हे खूप महत्त्वाचे असेही ते म्हणाले.

जगदीश कुंटे म्हणाले, हे पुस्तक म्हणजे सांस्कृतिक दस्ताऐवज ठरणार आहे. छंदिष्ट आणि नादिष्ट लोकच खूप तळमळीने असे काम करू शकतात. आपल्या पूर्वसुरींचे कार्य त्यामुळे कळणार आहे. बेळगावला खूप मोठी संगीत आणि नाटय़ परंपरा आहे. बेळगावचे रसिक कलासक्त, चिकित्सक तितकेच सहिष्णू आहे. आज येथे अनेक संस्था कार्यरत आहेत. परंतु त्यांनी परस्परांकडे स्पर्धक म्हणून मानता परस्पर सहकार्य करणे आवश्यक आहे.

प्रारंभी श्रीवत्स हुद्दार, श्रीज दाणी, अनुष्का आपटे, नुपूर रानडे यांनी संगीत नाटकातील नांदीचे गायन केले. त्यांना नारायण गणाचारी आणि मुकुंद गोरे यांनी वाद्यांची साथ दिली. पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. लता कित्तूर यांनी सर्वांचे स्वागत केले.

पुस्तकाबद्दल बोलताना नंदन हेर्लेकर यांनी तरुण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकुर यांनी प्रथम आपल्याला लेखनाची संधी आणि व्यासपीठ दिले. अनेकांनी सतत उत्तेजन दिले. त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली, असे सांगितले. तर मेधा मराठे यांनी बेळगावच्या नाटय़ परंपरेचा संक्षिप्त इतिहास कथन केला. यावेळी या पुस्तकासाठी सहाय्य केलेले अनुप जत्राटकर, मोहन सडेकर यांचा तसेच मुखपृष्ठ तयार करणारे साईश नाकाडी, अंकिता आपटे, मनीषा सुभेदार यांचा सत्कार करण्यात आला. आणखी एक सत्कारमूर्ती आनंद संगम अनुपस्थित होते. सूत्रसंचालन रोहिणी गणपुले यांनी केले. श्रीधर कुलकर्णी यांनी आभार मानले. 

नटराजाच्या मूर्तीसमोर सर्व वाद्यांची रचना…

या पुस्तक प्रकाशन समारंभात नटराजाच्या मूर्तीसमोर सर्व वाद्यांची रचना मांडण्यात आली होती. नाटकाचा लोगोही ठळकपणे लावण्यात आला होता. त्यावर नादरंग या पुस्तकाची मोठी प्रतिकृती ठेवण्यात आली होती. त्याचे अनावरण गिरीश पतके यांनी केले.

Related posts: