|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सैनिकांचा आत्मविश्वास देतो सामान्यांना दिलासा

सैनिकांचा आत्मविश्वास देतो सामान्यांना दिलासा 

पुणे / प्रतिनिधी : 

देशासाठी लढताना अनेक सैनिकांना अपंगत्व येते. मात्र, आपण अशा सैनिकांना अपंग नाही, तर दिव्यांग सैनिक असे म्हणायला हवे. त्यांच्यामध्ये देखील सामान्य सैनिकांप्रमाणे जोश आणि देशासाठी लढण्याची जिद्द असते. त्यांच्याकडे पाहून सामान्य नागरिकांचा आत्मविश्वास देखील वाढतो. दिव्यांग सैनिकांच्या चेह-यावरील हास्य आणि आत्मविश्वास हा सामान्य भारतीय नागरिकांना सुरक्षेचा दिलासा देणारे आहे, असे मत एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले. 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिटयूटमध्ये शिकणा-या आजी दिव्यांग सैनिकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिटयूटचे विश्वस्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे (निवृत्त), इन्स्टिटयूटचे डीन कर्नल वसंत बल्लेवार, अभिनेत्री भाग्यश्री नलवे, शैला काळे, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, दीपक वनारसे, शिरीष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. सैनिकांच्या हस्ते आरती करण्यात आली.
कॅप्टन चंद्रशेखर चितळे म्हणाले, तब्बल १०२ वर्षांपूर्वी क्विन्स मेरी टेक्निकल इन्स्टिटयूटची स्थापना झाली. ज्या सैनिकांना देशासाठी लढताना अपंगत्व येते, त्यांचे पुर्नवसन करण्याचा प्रयत्न येथे केला जातो. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आणि कोर्सेस येथे चालविले जातात. समाज या सैनिकांसोबत असल्याने हे शक्य होते, असेही त्यांनी सांगितले.
 
भरत अग्रवाल म्हणाले, नवरात्र उत्सव हा शक्तीचा उत्सव आहे. देशासाठी लढणारे सैनिक हे देखील शक्तीच प्रतिक आहेत. त्यामुळे त्यांचे औक्षण आणि सन्मान करण्याकरीता ट्रस्टने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सामान्य नागरिक देखील तुमच्यासोबत आहेत, असा संदेश यानिमित्ताने आम्ही देत आहोत, असेही त्यांनी सांगितले. आमचे आज आमच्यासोबतच आहे. मात्र ट्रस्टने आमचा मानसन्मान केला, हा क्षण येईल असे वाटले नव्हते. यामुळे आमच्या कुटुंबाला देखील आमचा अभिमान आहे, असे सांगत दिव्यांग सैनिकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. अ‍ॅड.प्रताप परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.

Related posts: