|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कां पां न येची श्रीपती?

कां पां न येची श्रीपती? 

रुक्मिणी मनोमन विचार करते-माझ्यापाशी कडकडीत वैराग्य नाही. मग मी फुकटच कृष्णाची भेट मागते, हे योग्य आहे काय? माझी कृती साधना काहीच नाही, फक्त तोंडाचीच बडबड. तीच मला अडथळा बनली काय? कृष्णाने विचार केला असेल-शिवादी माझे चरणरज इच्छितात आणि ही मात्र पत्र पाठवते! ही रुक्मिणी आळशी आहे. हिला कुठलीही तप साधना करायला नको. मी काही हिच्यासाठी त्या कुंडिनपुरात उडी घालणार नाही. केवळ पत्र लिहून मी प्राप्त झालो असतो तर साधक लोक माझ्या प्राप्तीसाठी जन्मोजन्मी का शिणले असते? ही रुक्मिणी केवळ वेडी आहे. हिच्यासाठी मी कुंडिनपुराला जाणार नाही.

कृष्ण न यावया एक भावो । द्विजें देखिला देवाधिदेवो ।

विस्मय दाटला पाहाहो । कार्य आठवो विसरला ।

कृष्ण देखतां त्रिशुद्धी । ब्राह्मणासी लागली समाधी ।

हरपली मनोबुद्धी । लग्नशुद्धी कोण सांगे ।

जे कृष्णासी मीनले । ते परतोनि नाहीं आले ।

मज आहे वेड लागलें । वाट पाहें द्विजाची ।

मायबापांसी नेणतां । वधूने पाठविलें लिखिता ।

हेंच जाणोनि निंदिता । येता येतां परतला ।

कां असे काही घडले असेल की कृष्णाला पाहिल्याबरोबर त्या सुदेव ब्राह्मणालाच समाधी लागली व माझा निरोप सांगायला तो विसरला? जे कृष्णाशी एकरूप झाले ते मन पुन्हा माघारी परतत नाही. त्याची मनबुद्धी हरपल्यावर लग्नाची वार्ता कोण सांगणार? मी वेडी मात्र सुदेव काही निरोप घेऊन येईल म्हणून वाट पाहते आहे. माझ्या आईबापांना न विचारता मी पत्र लिहिले म्हणून त्याला राग आला का? मग भगवान श्रीकृष्ण का येत नाहीत? असे अनेक विचार रुक्मिणीच्या मनात आले.

लग्नाआड येक राती । कां पां न येची श्रीपती ।

परात्पर उपरियेवरती । वाट पाहात उभी असे ।

डोळा नलगेचि शेजेशी। निदेमाजी देखे कृष्णासी ।

तेणे स्वप्न-सुषुप्तीसी । जागृतीसी नाठवे ।

अन्न न खाय तत्त्वतां । जीविता देखे कृष्णनाथा ।

गोडी लागली अनंता । न लगे आतां धड गोड ।

करूं जातां उदकपान । घोटासवें आठवे कृष्ण ।

विसरली भूक तहान । लागलें ध्यान हरीचें ।

तोंडी घालितां फोडी । घेऊं विसरली ते विडी ।

कृष्णी लागलीसे गोडी । अनावडी विषयांची ।

आळविल्या कानीं नायके । थापटिलीया न चक्के।  देह व्यापिले यदुनायकें ।  शरीरसुखे विसरली।

पाय ठेवितां धरणीं । कृष्णा आठवी रुक्मिणी ।

सर्वांगी थरथरोनी । रोमांचित होऊनि ठाके ।

लीला कमल घेतां हातीं । कृष्णचरण आठवतीं ।

नयनीं अश्रु लोटती । कृष्णप्राप्तीलागीं पिशी ।

आता मध्ये एकच रात्र राहिली. उद्या आपले शिशुपालाबरोबर लग्न लावून देतील. अजून कृष्ण कसा आला नाही. महालाच्या उंच गच्चीवर जाऊन टाच उंचावून रुक्मिणी कृष्णाची वाट पाहत उभी राहू लागली.

Ad.  देवदत्त परुळेकर