|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात बंडोबा झाले थंडोबा

जिल्हय़ात बंडोबा झाले थंडोबा 

महायुतीतील अडसर दूर पाच मतदारसंघात 32 उमेदवार

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हय़ात महायुतीमध्ये भाजपच्या वाटय़ाला एकही मतदरासंघ न आल्याने नाराज झालेल्या भाजपने रत्नागिरी वगळता अन्य चार मतदारसंघात बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. मात्र सोमवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी या भाजपच्या  बंडखोरांसह 8 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता पाच मतदारसंघात 32 उमेदवार रिंगणात आहेत. यात सर्वाधिक म्हणजे 11 उमेदवार दापोलीत तर सर्वात कमी 3 उमेदवार चिपळुणात लढत देणार आहेत. जिल्हय़ातील बंडोबा थंडोबा झाल्याने महायुतीसमोरची चिंता मिटली असून सर्वच मतदारसंघात महायुती व काँग्रेस आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे.

गुहागरमध्ये राणेंची माघार

  गुहागर मतदारसंघात अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणारे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आपण महायुतीच्या उमेदवाराचे काम खांदयाला खांदा लावून नव्हे तर एखादया सावलीप्रमाणे करणार असल्याचे रामदास राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राणे यांच्या माघारीनंतर शिवसेनेचे भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर, मनसेचे गणेश कदम, बसपाचे उदय पवार व वंचित बहुजन आघाडीचे विकास जाधव हे पाच उमेदवार रिंगणात राहीले आहेत.

दापोलीत साठेंसह तिघांची माघार

 दापोली मतदारसंघात युती आणि आघाडीतील बंडखोरी संपुष्टात आली आहे. भाजपचे बंडखोर केदार साठे आणि काँग्रेसचे बंडखोर मुश्ताक मिरकर व भाऊ मोहिते यांनी उमेदवारी अर्ज मंगळवारी मागे घेतले. त्यामुळे शिवसेनेचे योगेश कदम, राष्ट्रवादीचे संजय कदम आणि कुणबी समाजाच्या सुवर्णा पाटील यांच्यासह बसपचे प्रविण मर्चंडे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष खोपकर, अपक्ष विकास बटावले, विजय मोरे अपक्ष योगेश दिपक कदम, संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम असे 11 उमेदवार रिंगणात आहेत.

चिपळुणात खेतलांची माघार

 चिपळूण मतदार संघातून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार खेतल यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सदानंद चव्हाण, कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे शेखर निकम, बसपाचे सचिन मोहिते हे तीनच उमेदवार मैदानात राहीले असून निकम व चव्हाण यांच्यात ‘काटे की टक्कर’ रंगणार आहे.

राजापुरात तिघांची माघार

राजापूर मतदारसंघातून भाजपचे बंडखोर प्रसाद पाटाळे आणि संतोष गांगण व मनसेचे मंदार राणे या तिघांनी आपले अर्ज सोमवारी मागे घेतले. त्यामुळे महायुतीचे राजन साळवी, कॉंग्रेस आघाडीचे अविनाश लाड, मनसेचे अविनाश सौंदळकर, हिंदु महासभेचे विलास खानविलकर, अपक्ष राज पाध्ये, बसपाचे महेंद्र धर्मा पवार, कुणबी बहुजन स्वराज्य पक्षाचे संदिप ठुकरुल हे सात उमेदवार रेंगणात आहेत.

                    रत्नागिरीत सहाही उमेदवार मैदानात

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकाही उमेदवारांने माघार न घेतल्याने 6 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. महायुतीचे उदय सामंत, राष्ट्रवादीचे सुदेश सदानंद मयेकर, बसपचे राजेश सिताराम जाधव, वंचित बहुजन आघाडीचे दामोदर शिवराम कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे बाळा कचरे, अपक्ष संदीप यशवंत गावडे हे सहा उमेदवार मैदानात आहेत.

 

मुख्यमंत्र्यांनी हलवली सूत्रे

दापोली, गुहागर, चिपळूण आणि राजापूर या चार मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱया भाजपच्या उमेदवारांनी घेतलेल्या माघारीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य भुमिका बजावली आहे. महायुती बळकट करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हलवली असून त्यांनी बंडाच्या पवित्र्यात असलेल्या उमेदवारांना थेट फोन केला. महायुतीचे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या उमेदवारांना केल्या. त्यानंतर काहीवेळातच त्यांनी आपले अर्ज मागे घेतल्याचे काही उमेदवारांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

 

Related posts: