|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सख्ख्या बहिणींचा पाझर तलावात बुडून मृत्यू

सख्ख्या बहिणींचा पाझर तलावात बुडून मृत्यू 

प्रतिनिधी/ जत

जत शहरापासून काही अंतरावर असणाऱया तिप्पेहळ्ळी गावच्या हद्दीत असणाऱया चव्हाणवस्ती येथील पाझर तलावाच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. सानिका रामा भिसे (वय 10), कोमल रामा भिसे (वय 6) अशी त्यांची नावे आहेत. सानिका चौथीच्या वर्गात तर कोमल पहिल्याच्या वर्गात शिकते. त्या येथील मानेवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होत्या.

  आजी, आजोबा देवाला गेल्यानंतर जनावरे घेऊन चरावयास गेल्यानंतर येथे जवळच असलेल्या पाझर तलावात खेळता खेळता पाण्यात पडून बुडाल्याने ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने जत व तिप्पेहळ्ळी भागात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहिती अशी, जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर तिप्पेहळ्ळी गाव आहे. या गावच्या बाजूलाच आणि जत शहरापासून शेगाव रस्त्यावर  चव्हाणवस्ती आहे. या वस्तीवर मयत सानिका व कोमल या दोन मुली आपल्या आजी आजोबांकडे राहत होत्या. तर त्यांचे मूळ गाव तालुक्यातील खिलारवाडी हे आहे. या दोघी सख्ख्या बहिणींचे आई वडील मोल मजुरीसाठी गोवा येथे कामास आहेत. आई वडील कामानिमित्त असल्याने त्यांना आजोळी आजी आजोबांकडे शिक्षणासाठी ठेवण्यात आले होते.

दरम्यान, सोमवारी आजी आजोबा नवरात्र उत्सव सुरू असल्याने जत येथील यल्लम्मा देवी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गेले होते. जाताना त्यांनी आज शाळेला जावू नका घरा शेजारीच म्हशी चरवून आणा असे सांगितले होते. त्यानुसार या मुली म्हशी घेऊन जनावरे चरवत होते. जनावरे चरवत असतानाच येथील वाघमोडे यांच्या शेती जवळ नवीनच पाझर तलाव बांधला आहे. गेल्या चार दिवसात झालेल्या पावसाने हा पाझर तलाव तुडूंब भरला आहे.

या दोन्ही मुली या पाझर तलावाजवळ खेळत होत्या. यातील कोमल ही लहान मुलगी खेळता खेळता पाय घसरून तलावात पडली. तिला वाचवण्याच्या नादात सानिकाही या पाण्यात पडली. पाणी खोलवर असल्याने आणि मुलांना पोहता येत नसल्याने या दोघीही एकमेकींना वाचवण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाल्या.

दरम्यान, दुपारी त्यांचे नातेवाईक जगू बंडगर हे तलावा शेजारून जात असताना त्यांना एका मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. तर दुसरी मुलगी आता पाण्यातील गाळात अडकली होती. या घटनेची माहीती नातेवाईकांना दिली. तोवर तिचे आजी आजोबाही घरी आले होते. ही बातमी समजताच अनेक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या दोघी मुलींना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर जत पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

आई, वडील मुलींना नेणार होते

सानिका व कोमलचे आई वडील गोव्याहून कांही दिवसापूर्वीच खिलारवाडी या गावी आल्या आहेत. मंगळवारी दसऱयाची सुट्टी असल्याने या दोघीनांही ते गावाकडे घेऊन जाण्यासाठी सोमवारी संध्याकाळी जत येथे येणार होते. आई बाबा येणार असल्याने या दोन्ही मुली खूप खुशीत होत्या. परंतु तोवर काळाने त्यांच्यावर  झडप घातली. सानिका व कोमल या दोघीही खूप शांत आणि शाळेत हुशार मुली होत्या. या चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद जत पोलिसांत झाली आहे. फिर्याद जगू भुजा बंडगर यांनी दिली आहे. तर तपास कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत.

Related posts: