|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यात 30 जागांवर बंडखोरी; महायुतीला फटका बसण्याची शक्यता

राज्यात 30 जागांवर बंडखोरी; महायुतीला फटका बसण्याची शक्यता 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील तीस विधानसभा मतदारससंघात भाजप-शिवसेनेच्या इच्छूकांनी बंडखोरी केल्याने भाजप-शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात 50 मतदारसंघात 144 सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. त्याचा सर्वात जास्त फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

पक्षातील नेत्यांची बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना फारशे यश आले नाही. विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेक पक्षनिष्ठ नेत्यांची मने दुखावली होती. त्यातच भाजप-शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना विधानसभेचे तिकीट देऊ केल्याने दोन्ही पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात शिवसेनेचे रमेश पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. अंधेरी पूर्वमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढत आहे. शिवसेनेचे सतीश सावंत यांनी भाजपचे उमेदवार नितेश राणेंविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे. अशाच प्रकारे राज्यातील तीस विधानसभा निवडणुकांमध्ये इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.