|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘चर्चा’ मानसिक आरोग्याची; ‘फलश्रुती’ समाजस्वाथ्याची

‘चर्चा’ मानसिक आरोग्याची; ‘फलश्रुती’ समाजस्वाथ्याची 

शारीरिक आरोग्याच्या तुलनेत भावनिक आणि मानसिक आरोग्य हा आपल्याकडे दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. शारीरिक आरोग्याबाबत उद्भवणाऱया समस्या, या बऱयाच वेळेला दृष्य स्वरुपात समोर येत असल्याने त्यावर आपण शक्मय तितक्मया लवकर उपचार सुरू करू शकतो. अनेक शारीरिक व्याधी लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक उपायांनी आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पातळीवरही संपन्न होत असतो. शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या कामाचा आवाका नि:संशय मोठा ठरतो. मानसिक-भावनिक आरोग्याबाबत मात्र आपल्याकडे अनेक पातळय़ांवर जागरुकता आणि संवाद आढळत नाही. एकत्र कुटुंब पद्धतीतून विस्तारित (एक्स्टेंडेड) कुटुंबाकडे, विस्तारित कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे आणि आता ‘लिव इन’ पर्यंत झपाटय़ाने झालेला बदल समाजाने स्वीकारला आहे. स्पर्धात्मक मानसिकतेने ‘आनंदा’ वर केलेला कब्जा, तंत्रज्ञानाने भावविश्वावर घेतलेली पकड या सर्व वेगवान घडामोडींमध्ये समाधानाच्या अभावाने मानवी आयुष्यात मोठी गुंतागुंत निर्माण झालेली आहे. समाधान असणे, मानणे, गवसणे या अवस्थांमध्येच मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याच्या प्रश्नाची उकल आहे.

आपल्या आजूबाजूचे कितीतरी लोक नैराश्याने ग्रासलेले असतात हे आपल्या गावीही नसते. नैराश्याची समस्या ही केवळ आपल्याच देशात नसून जगभरात ‘नैराश्य’ या मानसिक आजाराने बाधित लोकांची संख्या जवळपास तीस टक्के इतकी आहे. तीव्र स्वरुपाचे नैराश्य जे आत्महत्येस प्रवृत्त करते ते मृत्युंच्या महत्त्वाच्या कारणांपैंकी एक आहे. याकरिताच जागतिक आरोग्य संघटनेने यावषी जागतिक मानसिक आरोग्य दिना (10 ऑक्टोबर) निमित्त ‘आत्महत्येस प्रतिबंध’ हा विषय मध्यवर्ती ठेवला आहे. भारतातील प्रौढ व्यक्तींपैंकी 10.6… व्यक्ती  कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने पीडित असल्याचे ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण 2016’ मधून समोर आले आहे. तसेच 2.7… व्यक्ती तीव्र नैराश्याचा सामना करत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. मानसिक आरोग्याची स्थिती गंभीर असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

सौम्य नैराश्य, उदासिनता याप्रकारची सर्वसाधारण मानसिक अनारोग्याची समस्या अनेक लोकांना भेडसावत असते. या समस्येची तीव्रता वाढल्यास आणि औषधोपचार टाळल्यास आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो. मानसिक आरोग्याबाबत आपल्याकडे आजही खूप गैरसमज असल्याचे आढळून येते. मानसिक आजारांवर उपचार न होण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यापैकी ‘ठपका’ (स्टिग्मा) हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. मानसिकदृष्टय़ा आजारी असणाऱया व्यक्तीच्या कुटुंबामध्ये सहजासहजी कुणी लग्नसंबंध ठरवण्यास तयार होत नाही. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीला उपचार सुरू केल्याने त्याबाबत विघातक चर्चा होऊन कुटुंबाला वाळीत टाकण्याचे, एकटे पाडण्याचे प्रकार अघोषितरित्या घडत असतात. त्यामुळे कुटुंबाकडून रुग्णाच्या मानसिक आजारावर व्यावसायिक वैद्यकीय उपचार न घेता आजाराची गोष्ट लपवून ठेवण्याकडेच कल असलेला दिसून येतो.

मानसिक आरोग्याबाबत कुटुंब, नातेवाईक, समाज आणि धोरणकर्ते-राज्यकर्ते या सर्वांमध्येच उदासिनता असल्याचे आढळून येते. देशाच्या आर्थिक नियोजनामध्ये आरोग्यासाठी राखून ठेवण्यात येणाऱया एकूण आर्थिक तरतुदींपैंकी फारच तुटपुंजी आर्थिक तरतूद मानसिक आरोग्यासाठी दिली जाते. साहजिकच प्रश्नाच्या व्याप्तीच्या तुलनेत मानसिक अनारोग्यावरील उपचार, व्यवस्थापन, कर्मचारी हे सर्व घटक अपुरे ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार आपल्याकडे दर एक लाख जनसंख्येमागे केवळ 0.3… मनोविकारतज्ञ, 0.07… मानसोपचार तज्ञ आणि 0.12… परिचारिका उपलब्ध आहेत. एकीकडे अपुरी असणारी वैद्यकीय यंत्रणा आणि दुसरीकडे लोकांचा तंत्र-मंत्राद्वारे उपचार करून घेण्याकडचा कल हा मानसिक आजारांच्या उपचारांमधील मोठा अडथळा आहे. मानसिक आजारांसाठीचे व्यावसायिक वैद्यकीय उपचार हे कित्येकदा सर्वसामान्यांच्या आवाक्मयाबाहेरचे असतात. त्यांची उपलब्धताही सहज सोयीस्कर नसते. मानसोपचार पद्धतीने मनोरुग्ण ठीक होण्यास थोडा दीर्घ कालावधी लागतो. त्याकरिता संयम, चिकाटी आणि आर्थिक पाठबळ हे घटक कुटुंबीयांची परीक्षा पाहणारे ठरतात. मानसिक आजारांच्या उपचारांबाबत ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात थोडी अधिक सजगता दिसून येते. लोकांमध्ये मानसिक आजारांबद्दल असणारे अज्ञान, जागरुकतेचा अभाव, समाजाकडून होणारी हेटाळणी, चेष्टा वा दुर्लक्ष, आरोग्य व्यवस्थेतील अनास्था, उपचार उपलब्ध होण्यामधील सहज-सुलभता आणि आर्थिक तरतूद हे सर्व घटक मानसिक रुग्णाच्या उपचारांबाबत परिणामकारक ठरत असतात.         मानसिक आरोग्याबाबतचा पहिला कायदा ‘ल्युनसी ऍक्ट’ हा ब्रिटीशकालीन भारतात करण्यात आला होता. भारतात 1987 चा कायदा आणि त्यानंतर 2017 मध्ये सुधारित कायदा अस्तित्वात आला आहे. सुधारित कायद्यानुसार मानसिक आजाराच्या प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालयात अथवा शासनाचे सहाय्य असणाऱया संस्थेमध्ये परवडणाऱया दरात उपचार मिळण्याचा अधिकार आहे. रुग्ण त्याच्या आजाराच्या बाबतीत समजू शकत असेल तर उपचारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार रुग्णाला आहे. या अधिकाराअंतर्गत रुग्ण उपचार घेण्यास नकारही देऊ शकतो. या कायद्यानुसार मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला समाजात राहण्याचा अधिकार आहे. मानसिक आजाराची महिला रुग्ण असेल तर तिला तिच्या तीन वर्षांच्या आतील बालकापासून वेगळे करता येणार नाही असे या कायद्यात नमूद केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आजारांच्या उपचारांबाबत गुप्तता पाळण्यात येईल असे या कायद्यात म्हटले आहे. आणखी काही महत्त्वाचे बदल जसे, मानसिक रुग्ण व्यक्तीला साखळीने बांधून ठेवता येणार नाही अथवा तिच्यावर अत्याचार करता येणार नाही. अल्पवयीन रुग्णांवर ‘शॉक’ देण्याच्या उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार नाही. तसेच प्रौढ व्यक्तीला उपचार करताना आधी औषधे अथवा भूल दिली जाईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवीन कायद्याप्रमाणे मनोरुग्णाकडून केला गेलेला आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरवला जाणार नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये पोलिओ, क्षयरोग यासारख्या आजारांवरील उपचारांचे महत्त्व पटवून देण्याकरिता सिनेकलाकार, मान्यवर खेळाडू पुढे आलेले आहेत. सेलिब्रेटींकडून प्रचारित होणारा संदेश मोठय़ा प्रमाणावर सर्वसामान्यावर परिणामकारक ठरत असतो. सिने अभिनेत्री दीपिका पदुकोणने आपल्याला नैराश्याचा आजार झाला असल्याचे आणि त्यावर तिने कुटुंबीयांच्या मदतीने समर्थपणे मात केल्याचा उल्लेख खूपच प्रेरणादायी राहिलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेणाऱयांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याकरिताही सेलिब्रेटींनी पुढाकार घेऊन जनमानसात जागरुकता निर्माण केल्यास आत्महत्येच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंब, नात्यातील निरोगी संवाद वाढणे आवश्यक आहे. स्वमग्नतेत रमलेल्या आजच्या सेल्फीवेडय़ा आत्मकेंद्री तरुणाईला आभासी जगताऐवजी, वास्तवातील चढ-उतारांना सामोरे जायला शिकवायला हवे. भावनिक-मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवरील मध्यवर्ती चर्चा आणि उपाय हे सुदृढ समाजस्वास्थ्याचे लक्षण आहे.

डॉ. स्वाती अमराळे-जाधव