|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माझे निघों पाहती प्राण

माझे निघों पाहती प्राण 

रुक्मिणीने झोपण्यासाठी मंचकावर अंग टाकले पण डोळा लागेना. निद्रा लागलीच तर स्वप्नातसुद्धा कृष्णच दिसू लागला. मग हे स्वप्न आहे कां, निद्रा आहे कां, जागृती आहे, हे काही कळेना. तिला भूक लागेना. बळेच कोणी जेवायला बसविले तर अन्न गोड लागेना. पाणी पिताना घोटासवे कृष्ण आठवू लागला. भूक-तहान हरपली. हरीचे ध्यान लागले. सखीने तोंडात घास घातला तरी ती खाईना. काही बोललेले तर तिला ऐकू येत नव्हते. पाठीवर थाप मारली तर ती चमकत नव्हती. शरीराची शुद्ध नव्हती. धरणीवर पाय ठेवला की कृष्ण आठवायचा व अंग रोमांचित होऊन ती थरथरायची. हातात खेळण्यासाठी कमळ घेतले की ती कृष्णाचे चरण आठवायची. डोळय़ातून अश्रुधारा वाहायच्या. कृष्णप्राप्तीसाठी ती वेडीपिशी झाली होती.

गोविंदें हरिलें मानस । जाहली विषयभोगीं उदास ।

पाहे द्वारकेची वास ।  मनीं आस कृष्णाचीं  ।

कां पां न येचि गोविंद ।  तरी माझेंचि भाग्य मंद ।

नाहीं पूर्वपुण्य शुद्ध । म्हणौनि खेद करीतसे  ।

मग म्हणे गा कटकता । किती करूं गे आहाकटा ।

मरमर विधातया दुष्टा ।  काय अदृष्टा लिहिलें असे  ।

आजिचेनि हें कपाळ ।  कृष्णप्राप्तीविण निष्फळ ।

म्हणूनियां भीमकबाळ । उकसाबुकसीं स्फुंदत  ।

मज नलगे विंजणवारा । तेणे अधिक होतसे उबारा ।

प्राण रिघो पाहे पुरा । शार्ङ्गधरावांचोनि  ।

आंगी न लावा गे चंदन । तेणें अधिकचि होय दीपन ।

माझे निघों पाहती प्राण । कृष्णचरण न देखता  ।

रुक्मिणी मनोमन विचार करू लागली-माझ्यामध्ये श्रीकृष्णांनी काही न्यूनता पाहिली कां? मग ते पाणिग्रहण करण्यासाठी का येत नाहीत? माझे पूर्वपुण्य शुद्ध नाही कां? मग ते कां येत नाहीत? माझे कपाळ कृष्णप्राप्ती वाचून निष्फळ आहे. असा विचार करून भीमकी स्फुंदून रडू लागली. तिच्या कोमल हृदयात दु:ख मावेना. तिचा तोल जाऊ लागला.

मालती नावाच्या दासीने तिला सावरून धरली. गंधवती तिला वाळय़ाच्या पंख्याने वारा घालू लागली. पानदानधारिणी दासीने खिन्नपणे तिला सुपारी न घातलेला विडा दिला. नंतर कापुराचा करंडा तिच्यासमोर धरला. पण त्यामुळे तिच्या विरहाला आणखीच भरती आली. नंतर तिच्या गायिकेने मधुर गीत म्हणून दाखविले पण तरीही ती ऐकेना. तिची तंद्री लागली होती. कृष्णाच्या ओढीने तिची उन्मनी अवस्था झाली होती. रुक्मिणी म्हणाली-सख्यांनो! मला विंजणवारा नको. त्याचा मला उबारा होत आहे. माझ्या अंगाला चंदन लावू नका. त्यामुळे माझे अंग जळत आहे. तिला आसन, भोजन, शयन, पान, अंजन, तांबूल, फूल, क्रीडाकौतुक, गायन काहीच आवडेना. रुक्मिणीच्या या अवस्थेला विरहिणी असे म्हणतात. ज्ञानेश्वर माउली एका विरहिणीत असेच वर्णन करतात-

कृष्णवेधें विरहिणी बोले । चंद्रमा उबारा करितो गे माये । न लावा चंदनु न घाला विंजणवारा । हरिविण शून्य शेजारू गे माये ।

 

Ad.  देवदत्त परुळेकर