|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्फोटासारखा आवाज अन् घर हादरले

स्फोटासारखा आवाज अन् घर हादरले 

माडय़ाचीवाडी येथे विजेचा थरार : प्रचंड वित्त हानी : सुदैवानेच जीवितहानी नाही

भिंतींना तडे, विजेची बटणे, बल्ब निखळले

स्वच्छतागृहावरही पडली वीज

वार्ताहर / कुडाळ:

विजेच्या लखलखाटासह ढगांचा प्रचंड गडगडाट सुरू असताना माडय़ाचीवाडी-राईवाडी येथील चंद्रकांत पांडुरंग गावडे यांचे घर व स्वच्छतागृहावर वीज कोसळली. यात घराच्या दर्शनी खोलीतील भिंतीला तडा गेला. विद्युत वाहिन्या जळून गेल्या. स्वीच (बटणे) व बल्बही निखळून जमिनीवर फेकले गेले. या तीव्र धक्क्याने त्यांचे घर हादरून गेल्याने आतील सर्वजण घाबरले. कुटुंबातील सदस्यांना सौम्य धक्का बसल्याची जाणीव झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

कुडाळ तालुक्यात मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह जोराचा पाऊस कोसळला. हा आवाज सर्वांना हादरून टाकणारा होता. काही भागात वादळी वाऱयाने झाडांची पडझड झाली.

माडय़ाचीवाडी-राईवाडी येथील चंद्रकांत गावडे यांच्या घरासमोरील ‘शिवण’ झाडावर वीज कोसळली. त्याचे लोळ गावडे यांचे घर व स्वच्छतागृहावर धडकले. या विजेची तीव्रता एवढी होती की, शिवण झाडाच्या शेंडय़ाकडील सालीच्या चिरफाळय़ा उडाल्या. गावडे यांच्यासह कुटुंबातील चार सदस्य घरात होते. प्रचंड आवाजाने त्यांचे घर हादरले. घराच्या दर्शनी खोलीत विश्रांती घेत असलेल्या गावडे यांना विजेचा सौम्य धक्का जाणवला. घरातील माणसेही घाबरली.

घरातील वीज मीटरचा फ्यूज, काही स्वीच (बटणे) व बल्ब निखळून फेकले गेले. भिंतीनाही भेगा गेल्या. संपूर्ण वायरिंग व टीव्हीची केबल जळाली, तर स्वच्छतागृहाची इमारत स्लॅबची असून एका ठिकाणचे प्लास्टरही निखळले. तसेच स्वीच बाहेर फेकले गेले. यात गावडे यांचे मोठे नुकसान झाले.

जेवण करून आम्ही विश्रांती घेत होतो. काहीवेळाने लखलखाट व गडगडाटासह पाऊस सुरू झाला. ‘तडतड’ असा आवाज होऊन पेटल्यासारखे दिसले व काही क्षणातच स्फोट व्हावा, तसा भलामोठा आवाज आला. घरातील स्वीच व बल्ब फेकले जाऊन जमिनीवर पडले. या घटनेने आम्ही घाबरलो. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, असे सचिन गावडे यांनी सांगितले.