|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » राफेलबद्दल काँग्रेसला पोटशूळ : शाह

राफेलबद्दल काँग्रेसला पोटशूळ : शाह 

हरियाणातील प्रचारमोहिमेचा केला शुभारंभ : शस्त्रपूजनावरून काँग्रेसच्या टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/ कैथल

 केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी हरियाणातील प्रचारसभेत राफेलपूजनावरून काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. काँग्रेस पक्ष राफेलच्या पूजेलाही विरोध करतो. कलम 370 हद्दपार करण्याच्या निर्णयाला विरोध आहे का समर्थन हे काँग्रेसने सांगावे, असे आव्हान शाह यांनी दिले आहे. काँग्रेस नेते मलिकार्जुन खर्गे यांनी राफेल ताब्यात घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा फ्रान्स दौरा आणि तेथे करण्यात आलेल्या पूजेला तमाशा ठरविले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ यांनी फ्रान्समध्ये मंगळवारी राफेलचे शस्त्रपूजन केले असता काँग्रेसला ते आवडलं नाही. विजयादशमीनिमित्त ‘शस्त्रपूजन’ केले जात नाही का? टीका करताना काँग्रेसने भान ठेवण्याची गरज असल्याचे म्हणत शाह यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे.

राफेल स्वरक्षणासाठी

राफेल लढाऊ विमान हे हल्ल्यासाठी नव्हे तर स्वरक्षणासाठी आहे. राफेल या लढाऊ विमानाला वायुदलात सामील करून देशाच्या सुरक्षेला बळकटी देण्याचे काम केल्याने पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांचे अभिनंदन करतो असे उद्गार गृहमंत्र्यांनी काढले आहेत.

शस्त्रपूजेला विरोध का?

शस्त्रपूजेवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने शाह यांनी प्रखर टीका केली आहे. मंगळवारी विजयादशमीचा सण होता आणि तो असत्यावरील सत्याचा प्रतीक असून शस्त्रपूजन करूनच साजरा केला जातो. काँग्रेसचा शस्त्रपूजेला अखेर विरोध का हेच उमगतं नसल्याचे शाह म्हणाले.

विरोधक दिशाहीन

निवडणुकीचा काळ आता सुरू झाला असून आमच्या विरोधकांना प्रारंभ कुठून करावा हेच समजेनासे झाले आहे. विरोधकांकडे कुठलीच दिशा नसून ते पूर्णपणे भरकटले आहेत, असा आरोप शाह यांनी केला आहे. कलम 370 चा मुद्दा

5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम 370 हद्दपार केले होते. 70 वर्षांपासून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात जम्मू-काश्मीर देशासोबत पूर्णत्वाने जोडले गेले नव्हते अशी सल होती. तीन-तीन पिढय़ांपर्यंत शासन करणाऱयांमध्येही कलम 370 हद्दपार करण्याचे धाडस नव्हते, असे शाह यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारचा तमाशा

अशाप्रकारच्या तमाशाची गरज नव्हती, बोफोर्स खरेदीवेळी देखाव्यासाठी तेथे कुणीच गेले नव्हते, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे यांनी केली होती. पण त्यांनी राफेलवर ओम लिहिणे आणि त्याची पूजा करणे हे योग्य की अयोग्य याचा निर्णय वायुदलाच्या अधिकाऱयांनी घ्यावा असे म्हटले आहे.  राफेलच्या चाकांखाली लिंबू दिसून आल्याने काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी प्रश्न उपस्थित केले होते. काहीच ठोस न करता प्रत्येक गोष्टीत नाटय़मयता निर्माण करण्यात मोदी सरकारचा हातखंडा असल्याची टिप्पणी दीक्षित यांनी केली होती.

राफेल विमानाची पूजा

फ्रान्समध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी राफेलचे शस्त्रपूजन करत त्याला नारळ वाहिला होता. तसेच विमानावर ओमचे चिन्ह काढले होते. मेड इन फ्रान्स असलेल्या 36 राफेल विमानांपैकी पहिले विमान ज्याचा टेल नंबर आरबी-001 असा आहे ते मंगळवारी फ्रान्सकडून भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. वायुदलाच्या वर्धापनदिनी आणि दसऱयाच्या मुहूर्तावर ते भारताला मिळाले आहे.

Related posts: